आपलं शहर

लॉकडाऊनमुळे मुंबईत कुणाची झाली चांदी, कुणाला बसला फटका; पाहा सविस्तर

येत्या १४ एप्रिलला लॉक डाऊन संपण्याच्या आशेने आपण मुंबईकर खुश होतो; कारण कधी न थांबवणाऱ्या मुंबईला एका परक्या देशाच्या आजराने थांबावं लागलं होतं, आता तीच मुंबई परत चालू होणार होती. 

त्यामुळे आपल्याला कामावर जायला मिळणार, मुंबईत पुन्हा धावायला मिळणार, फिरण्याचं स्वातंत्र्य मिळणार आणि बरच काही, अशी स्वतःच्या मनाची तयारी करत असताना आपल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘जोर का झटका धीरेसे दिला’ आणि आपण पुन्हा निराश झालो.
असो, वाढता आकडा पाहता हे करणे सुरक्षिततेचे आणि महत्वाचे आहेच. आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईकरांच्या आयुष्यात निश्चितच लॉकडाऊनमुळे विपरीत परिणाम झालेत. पण याची विरुध्द बाजू पाहिली तर काही व्यवसाय हे लॉकडाऊनच्या काळात पहिल्यापेक्षा तेजीत आलेत. आता तुम्हाला नुकसान कुणाचे झाले हे जरी माहिती असेलच, तरी यासर्वांमुळे फायदा कुणाचा झालाय हाच प्रश्न पडला असेल. तर आम्ही आपल्यासाठी उत्तर घेऊन तयार आलोय.
आपल्या मुंबईची आर्थिक स्थिती मुख्यतः तीन गोष्टींवर अवलंबून असते. आयात-निर्यात, गुंतवणूक आणि त्या गोष्टीचा वापर. सध्याच्या परिस्थितीत लॉक डाऊनमुळे हे सगळं ठप्प पडलेलं आहे.
लॉक डाऊनमुळे कुणाची झाली चांदी?
आपण नाण्याची एक बाजू म्हणजे फायदा कुणाला झाला त्याकडे आधी वळूया…
घरात राहून आपण एक टीव्ही आणि दुसरं म्हणजे मोबाईल या गोष्टी वापरण्यावर भर दिलाय. यावरून समजतं की नेट सप्लाय करणाऱ्या कंपनींना सगळयात जास्त फायदा झालाय. तसेच सगळ्यात मोठा फायदा झाला ते म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स अॅपला.
मिटिंग, लेक्चर्स वा बातचीत असो आजकाल सर्वजण व्हिडिओ कॉन्फरन्सला पसंती देत आहेत. डीझनी, नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम यांसारख्या मनोरंजक अॅपवर वेब सिरीजला जास्त ऍट्रक्शन मिळत आहे. त्यामुळे या अॅपची चांदीच चांदी झालेली पाहायला मिळतेय. आजकाल घरी बसून ऑनलाइन गेमिंगला देखील प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे त्यांनाही लॉकडाऊनचा सकारात्मक प्रतिसाद मिळातोय.
हे सगळं सुरू असताना अत्यावश्क सेवांच्या नावाने अनेक व्यवसायांचादेखील यात आपण समावेश करू शकतो. तो म्हणजे अनेक भाजी मार्केट्स, किराणा दुकान, फुड एजन्सी, मेडिकल्स एजन्सी, खाजगी अॅम्ब्यूलन्स, काही रिक्षा-टॅक्सी धारक, खाद्य पुरवठा करणाऱ्या संस्था अशा अनेकांना थोड्याफार प्रमाणात फायदा होतच आहे. यात अनेक किरकोळ भाजी विक्रेते आव्वाच्या सव्वा भाव करून भाजीची विक्री करत असल्याने अशा अनेकांच्या धंद्यात वाढ होत आहे.

आम्ही एका अशाच भाजी विक्रेत्याशी संवाद साधला, त्यानेही नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला एक माहिती सांगितली. त्याच्याकडे काही दिवसांच्या भाजीपाल्याचा साठा होता. सोबतच परवाणा काढून काही दलाल त्याच्यापर्यंत भाजीचा पुरवठा करत असतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्या दलालाला काही प्रमाणात पैसे जास्त द्यावे लागतात, म्हणून आम्ही सामान्य ग्राहकांकडून त्याची भरपाई करून घेत असतो. याआधी आम्हाला ज्या दराने भाजीपाला मिळत असे, त्यातून आम्ही पाच ते दहा रुपये  कमवायचो, मात्र या सगळ्या बंदमुळे आम्हालाही दलालाकडून भाजी खरेदी करताना मोठी रक्कम मोजावी लागते, त्यामुळे आम्हाला दर वाढवल्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्याने सांगितले.

लॉकडाऊनमुळे कुणाचं पडलं मार्केट  
आता नाण्याची दुसरी बाजू. 
एका वाक्यात सांगायचं झाल्यास मुंबईत राहाणाऱ्या एकाबाजून सगळ्यांनाच याचा फटका बसला आहे. लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला. हातावर पोट असणाऱ्यांचे तर एक वेळच्या जेवणाचे हाल झालेत. आता मोठं-मोठ्या कंपन्यांचा विचार केला तर हवाई वाहतूक असेल, ट्रायव्हल एजन्सी, फिल्म इंडस्ट्री, हॉटेल्स, जाहिरात व्यवसाय, बांधकाम, छोटं-मोठ्या गुंतवणूकीच्या बँका, क्रीडा व्यवसाय यांना मोठा फटका बसलाय.
मुंबईमध्ये सर्वात जास्त चालणारे हे व्यवसाय आहेत. आमदनीचे हे सर्व मार्ग बंद असल्यामुळे लोकांकडे पैसा येणे बंद झाले आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसला तो म्हणजे आपल्या शेअर बाजाराला. तसेच छोट्या मोठ्या व्यवसायांना. यात पापड, लोणचं तसेच इतर खाद्य उत्पादन, मुंबईतील सगळ्यात जास्त प्रमाणात चालणारा मस्त व्यवसाय यांनाही लॉकडाऊनची झळ बसली.
ना नफा; ना तोटा
आता मुंबईतील असे काही व्यवसाय आहेत, ज्यांना ना नफा झाला ना तोटा. अर्थातच आपल्या अत्यावश्यात सेवा. बँक, भाजीपाला (वर उलेख केलेले भाजी विक्रेते सोडून), किराणा दुकान, हॉस्पिटल इत्यादी. जीव मुठीत धरून यांना सगळ्या सेवा सर्वसामान्यांसाठी चालू ठेवाव्या लागत आहेत.

त्यामुळे तुम्ही तुमचा जीव मुठीत ठेवून बाहेर पडू नका, काळजी घ्या; आज जगू, तर उद्या अख्खी मुंबई फिरु…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments