आपलं शहर

मुंबईतील स्लमडॉग मिलेनिअर; अंगावर काटे आणणारी परिस्थिती

IMG 20200429 WA0001
ऑस्करविजेत्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा चित्रपट मुंबईकरांनी आवर्जून पाहिला असावा. काडीमोल किंमत नसलेल्या धारावी शहराला या चित्रपटाने गरिबीचं ‘लाईव्ह’ प्रदर्शन दाखवून करोडोंची किंमत दिली. परदेशी पर्यटकांची पसंती असलेल्या यादीत आता ताजमहालच्या आधी धारावी टूरचा नंबर लागतो. आज मुंबईतील जवळपास 41 टक्के लोकसंख्या ही धारावीत आहे, हे 2011 च्या जनगणनेनुसार स्पष्ट होते. छोट्यापासून मोठे धंदे हे धारावीच्या त्या छोट्या छोट्या गल्लीमधून केले जातात. छोट्या धंद्याची मोठी राजधानी म्हणू न आपण धारावीकडे पाहू शकतो.
मुंबईतील स्लमडॉग मिलेनिअरवाला शहर
छोट्याशा खोलीवजा घरात राहणारी चारपेक्षा जास्त माणसं, काही तासच उपलब्ध असणारं पाणी, गल्ली-बोळाच्या टोकावरची सार्वजनिक शौचालयं, अस्ताव्यस्त दाटीवाटीची वस्ती, वाहती उघडी गटारं यातून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तयार झालेलं धारावीकरांचं निकृष्ठ दर्जाचं घातक जीवनमान समजते. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असे बिरूद बाळगणाऱ्या धारावीत बाजारातल्या मागणीनुसार वस्तूचं उत्पादन केलं जातं. एका प्रवासीला बांद्राकडून सायनकडे रस्त्यावरून जाताना कल्पनाही येत नसावी की धारावीत लाखो छोट्या-मोठ्या व्यवसायांचे कारखाने आहेत. सकाळच्या इडली-चटणीच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या दारूच्या चकण्यापर्यंत सर्व काही धारावीत तयार केलं जाते. घनदाट लोकवस्ती असलेल्या या शहरात बेकरीसोबतच मिठाई, चॉकलेट, लाडू, चिवडा, फरसाण, बिस्किटं, चिक्कीचे कारखाने आहेत.
येथे कपड्यांमध्ये शर्ट बनविण्याचा व्यवसाय जास्त चालतो. मोठ-मोठ्या कंपन्या शर्टचा डायरेक्ट माल धारवीतून घेतात. धारावीत काय मिळत नाही; दुकानांपासून ते कारखान्यांबरोबर, मंदिर-मशिदी पासून तर चर्चपर्यंतची स्थापना या शहरात केली आहे. संपूर्ण मुंबई डेव्हलप होत गेली, मात्र अनेक लोकांच्या मागणीनंतरही धारावी झोपडपट्टी ती झोपडपट्टीच राहिली.
धारावीचे पाणी नेमकं मुरतय कुठे?
महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा, मंजुरी आणि पुनर्विकास कायद्यानुसार 1971 साली धारावीला झोपडपट्टी म्हणून मान्यता मिळाली. धारावीतल्या नियोजनातील त्रूटी अनेक संकटांच्या वेळी समोर आल्या परंतु, झालेला खड्डा बुजवण्यात कुणीही रस दाखवला नाही. 1993 सालची हिंदू-मुस्लीम दंगल, 2006 साली मुंबईत आलेला महापूर आणि 2016 साली मोदी सरकारने केलेली नोटबंदी असे अनेक मोठे धक्के धारावी पचवत उभी आहे. त्याच वेळी जर धारावीकडे लक्ष दिले असते, तर आता ही वेळ आली नसती.
शहरीकरण करण्याच काम सुरू असताना या झोपडपट्टीचा विचार केला असता तर आज चित्र वेगळंच असतं. स्थलांतरित लोकांचे प्रमाण आटोक्यात आणून धारावी शहरात सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्बंध घातले असते, त्रुटी असलेल्या सोई सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असत्या, तर कदाचित आज धारावी नव्या प्रतिमेसमवेत ठाम उभी असती. ब्रिटिशकालीन या झोपडपट्टीला पुनर्वसनाची नाही तर नवीन संकल्पनेची गरज आहे, जे होताना दिसत नाही. अनेक वर्षे रखडलेले धारावी शहराचे काम आज कोरोना संकटात आणखी धोकादायक ठरले आहे.
कोरोनाच्या विळख्यातुन कशी बाहेर पडेल धारावी
ब्रिटीशांच्या काळापासून अस्तित्वात असलेली धारावी हे मुंबईतील मोक्याचे ठिकाण आहे. पश्चिमेकडे माहीम स्टेशन, पूर्वेकडे सायन स्टेशन आणि उत्तरेच्या दिशेला मिठी नदी, यांच्या त्रिकोणी बेचकीत धारावी परिसर येतो. अत्यंत दाटीवाटीच्या या परिसरात घराला चिकटून घर आहे. एका घरात 8 ते 9 माणसे आपले जीवन जगत आहेत. व्यवस्थितरित्या नसलेली पाण्याची सोय, सार्वजनिक शौचालय व आजूबाजुचा अस्वच्छ परिसर नेहमीच रोगाचे आमंत्रण देतो.
येथे सोशल डिस्टनसिंग पाळणे अश्यक आहे. कारण इथेच कोरोना रुग्णांची संख्या आगीसारखी दिवसेंदिवस वाढत आहे. हा संपुर्ण परिसर लवकरात लवकर खाली करणे, कोरोना चाचण्या वाढविणे, तसेच स्वच्छता, सॅनिटीझर मास्क या महत्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. आजच्या घडीला धारावीतील प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. सोशल डिस्टनसिंगचा विचार करता झोपड्यांचे सुतसुटीकरण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
मुंबईच्या अनेक यशाचं कारण असलेली हीच धारावी आज कोरोनाशी झुंज देताना मशाल नाही तर मुंबईची कमजोरी बनत आहे. मुंबईला धोक्याची घंटा म्हणजे आताची धारावीची परिस्थिती! अनेकांनी प्रकाश टाकूनदेखील धारावी काही बदलली नाही. भविष्य काळात आणखी संकट ओढवू नये म्हणून आतापासूनच धारावीकडे लक्ष दिलं नाही, तर काही दिवसात वणवा पेटेल, हे नक्की.
हेही वाचाच…
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments