एकदम जुनं

फक्त ‘त्या’ एका घटनेमुळे आज मुंबई महाराष्ट्रात आहे…

1 मे म्हटलं की महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी कामगार दिन म्हणूनदेखील ओळखला जातो, मात्र या दिवसाला कामगार दिन का म्हणतात, महाराष्ट्र वेगळा होण्यामध्ये आणि महाराष्ट्रात मुंबई येण्यासाठी कामगारांची कोणती भुमिका होती, हेच आपण पाहाण्याचा प्रयत्न करणार आहोत.

स्वातंत्र भारताच्या आधी आणि काहीसं नंतर, मुंबईत गिरणगाव नावाचा भाग खूप चर्चेत होता, सध्याही असतोच; मात्र त्याची खूप ठिकाणांमध्ये विभागणी झाली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी आणि मिळाल्यानंतर काही वर्ष या भागात मोठ्या कापड गिरण्या होत्या, सोबतच त्यात काम करणारे अनेक मुंबईतले स्थानिक कामगार होते. ते जितके आपल्या घरच्यांवर, कामावर प्रेम करत असत तितकच प्रेम त्यांचं मुंबईवर होतं आणि म्हणूनच कदाचित ते हुतात्मा झाले.

 
मुंबईतला गिरणगावातला गाजलेला चौक म्हणजे, फ्लोरा फांउटन. स्वातंत्र्याच्या अनेक बैठकी याच चौकात होत असत. मधोमध चौक असल्याने अनेक गिरणी कामगारांच भेटण्याचं ठिकाणदेखील हेच ठरायचं. त्यामुळे आंदोलनाची सुरूवात देखील इथूनच सुरू झाली. स्वातंत्र्य भारतानंतर वेगळ्या राज्यांचा विचार सुरू झाला होता, त्यातच मुंबई शहराचा विचारदेखील प्राथमिक स्वरुपावर केला जात होता. राज्य पुनर्रचना आयोगाने देशाच्या फाळण्या करताना मुंबई शहराचा गुजरातमध्ये समावेश केला होता आणि हेच कारण ठरलं मुंबईमध्ये असंतोष पसरण्याचं.
दिवस होता, 21 नोव्हेंबर 1956 चा. गुजरातमध्ये गेलेली मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेक संघटना प्रयत्न करू लागल्या, त्यात सगळ्यात मोठी संघटना होती, ती म्हणजे कामगार संघटना. यादिवशी गुजरातमध्ये गेलेली मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी घेतला. तशाप्रकारची तजविज करण्यात आली, पहिल्या पाळीतील कामावर गेलेले कामगार संध्याकाळी 4 वाजता सुटणार होते, ते सुटल्यावर फ्लोरा फांउटन जवळ भेटण्याच ठरलं होतं, याआधीच संघटित कामगार आणि पांढरपेशांचा एक विराट मोर्चा चर्चगेटहून आणि बोरीबंदरहून फ्लोरा फाउंटनकडे येऊ लागला, त्यात भर म्हणजे इकडे कामावरून सुटलेले सगळे कामगार फ्लोरा फाउंटनजवळ जमू लागले. परिणामी ही गर्दी पोलिसांना असह्य झाली.
यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून इथल्या कार्यालयात काम करणाऱ्या सर्व महिला वर्गाला घरी पाठवण्यात आले होते. हजारोंच्या संख्येत येणारा मोठा जमाव फ्लोरा फाउंटनच्या चौकात सत्याग्रहासाठी ठान मांडून बसला होता. त्याचदरम्यान या भागात जमावबंदी आणि सभाबंदी लागू करण्यात आली होती. तरीही अनेक लोक एकत्र जमा होऊ लागल्याने गर्दी पांगवण्याच्या उद्देशाने पोलिासांनी जमावावर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. वरुन लाठीचार्ज होत होता आणि अंगावर जखमा होत असतानादेखील लोक जाग्यावरून उठण्यास तयार नव्हते, त्यामुळे जसं फ्लोरा फाउंटनमधून कारंज्या उडत होत्या, तशाच रक्ताच्या कारंजा या चौकात उडू लागल्या आणि त्याच्यात अनेक कामगारांचा जीव गेला. शांततेत आंदोलन करणारे अनेक हुतात्मे शहिद झाले. संयुक्त महाराष्ट्रासाठी सुरू असलेल्या लढ्यात या दिवसांपर्यंत तब्बल 105 जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.
काय आहे, फ्लोरा फाउंटनची भानगड
त्याकाळच्या गिरणगाव आणि आताच्या चर्चगेट परिसरात एक लहान मुलीचं स्मारक उभे केलय, त्या जवळच हातात मशाल घेऊन उभे असलेल्या स्त्री-पुरुषाचा पुतळा देखील आहे, त्यालाच आता हुतात्मा चौक म्हणतात आणि स्वतंत्र काळात फ्लोरा फाउंटन असं त्याचं नाव होतं. स्वातंत्र्य भारताच्या काळात याच परिसरात डेव्हिड ससून नावाची व्यक्ती राहात असे. त्याच्या फ्लोरा नावाच्या मुलीचे लहानपणीच निधन झाल्याने त्याने आपल्या मुलीच्या प्रेमात एक स्मारक उभे केलं आणि त्या स्मारकाला फ्लोरा फाउंटन असं नाव दिलं. त्यानंतर हळूहळू तिथल्या संपुर्ण परिसराला फ्लोरा फाउंटन म्हणून ओळख पडू लागली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्मे याच चौकात धारातिर्थी पडले, त्यामुळे त्या हुतात्म्यांची आठवण म्हणून हाती मशाल असलेल्या क्रांतिवीर स्त्री-पुरुषांचा हाती मशाल घेतलेला पुतळा उभा केला आणि त्याला हुतात्मा स्मारक असे नाव देण्यात आले. त्याच्या सोबत असलेल्या परिसराला अखेर हुतात्मा चौक म्हणून ओळख निर्माण झाली.

या संपुर्ण हुतात्मांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणुस सोबतच कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर देशातल्या कॉंग्रेस सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात मुंबई घेऊन संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली.

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments