आपलं शहर

महाहॉटस्पॉट असलेल्या मुंबईत आहे एक कोरोना निगेटिव्ह गाव…

225116309
मुंबईच्या उन्हाळ्यात पावसाळ्याप्रमाणे कोरोनाचा महापूर आला आहे. याच महापुरात अनेक रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, तर मृत्यूंचा आकडाही तितच्याच गतीने वाढत आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी याच मुंबईतल्या एका कोपऱ्यात एक कोरोना निगेटिव्ह गाव आहे, नेमकं हे गावं कोणतं आणि कोरोना निगेटिव्ह राहाण्यासाठी या गावानं नेमकं काय केलं, हेच आपण पाहाणार आहोत.
लॉक डाऊन संपण्याची तारिख जवळ येऊनदेखील कोरोना संपण्याचे नाव घेत नाहीये, त्यामुळे याच मुंबईतला लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला. मुंबईत आज घडीला रेड झोन आहे, ऑरेंज झोन आहे, त्यातच एक ग्रीनझोनही आहेच. जिथे एकही नागरिक कोरोनाचा शिकार झाला नाही. मुंबईच्या भाईंदरमधून आत, समुद्राच्या दिशेने गेलं की गोराई बीच लागतो. याच बीचला लागून गोराई गाव आहे, जे कोरोनाच्या महामारीतदेखील कोरोना निगेटिव्ह आहे.
गोराई गाव म्हणजे कोरोनाचं महाहॉटस्पॉट असलेल्या मुबईतलं ग्रिन झोन होय. साधारण काळात अनेक मुंबईकर आपली सुट्टी घालवण्यासाठी याच गोराईच्या बीचवर येत असतात, मात्र हाच गोराई बीच तब्बल 20 वर्षांनंतर आज मानवविरहित आहे. कारण इतकच, की कोरोनाचा प्रकोप याही गावात होऊ नये, म्हणून इथल्या गावकऱ्यांनी घेतलेली खबरदारी.
या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला घरात बसून करायचं काय असा प्रश्न पडला असेल, तर त्यावरही एक सोल्युशन इथल्या गावकऱ्यांनी काढलय. “बैठे बैठे क्या करे, करे कुछ तो काम, शुरू करे अंताक्षरी, लेके प्रभु का नाम” असं म्हणत इथले लोक घरी राहून गाण्यांच्या भेंड्या खेळण्यास सुरूवात करतात. आपल्या पारंपारिक भाषेत नवनवीन गाणी तयार करून ती गाणी तालासुरात गायली जातात. 
या गावातदेखील रोजच्याप्रमाणे सर्वसाधारण बाजार भरलेला असतो. चर्चसाठी राखीव असलेली जमीन त्या बाजारासाठी दिली गेली, तिथल्या भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी आणि खरेदीदारांना भाजी खरेदी करण्यासाठी जागा ठरवून दिली. त्यामुळे सोशल डिस्टिंसिंगचे नियम व्यवस्थितरित्या पाळले जातात. त्यातच अजून एक नियम म्हणजे गावातला माल फक्त गावातच विकायचा आणि तो माल फक्त गावातल्या लोकांनीच खरेदी करायचा. त्यामुळे गावातील कोणी बाहेर जाणार नाही आणि बाहेरचं कोणी आत येणार नाही.
आता वेळ येते ती म्हणजे इथल्या मॅनेजमेंटची. गावात नवीन काहीतरी नियम लागू केला, तर तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. मग ते रेशन संदर्भात असो, बीएमसीकडून आलेले अनेक आदेश असो, पोलीस प्रशासनाकडून लागू झालेले नवी कायदे असो, हे तिथल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथल्या पंचायतीने एक शक्कल लढवली आहे. गावातल्या कोपऱ्या-कोपऱ्यात भोंगे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सगळ्या गावकर्यांना आगदी घरात बसून गावातली खडांखडा माहिती मिळत असते आणि सोबतच गावात नवीन काय नियम लागू केलाय, हे समजून घेण्यासाठी घरातून बाहेर पडण्याची गरजच भासत नाही. 
गोराई गाव हे समुद्रा किनारी असल्याने सहाजिकच इथे मोठ्या प्रमाणात मच्छीमारी चालतेय. मात्र मुद्दा असा आहे की गावातून मासेविक्रीसाठीदेखील बाहेर जायाचं नाही. त्यामुळे इथल्या मच्छिमारांवर मात्र या लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे, तरीही इथल्या मच्छीमारांनी गावकऱ्यांना पाठिंबा देत आपलं नुकसान जरी झालं, तरी आम्ही कोरोनावर मात करण्यासाठी हादेखील संघर्ष करण्यासाठी तयार आहोत, असा निर्णय घेतला आहे. 
या गावात जाण्यासाठी फक्त दोन प्रवेश आहेत, त्यामुळे गावात येणाऱ्या आणि गावातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकावर बारीक लक्ष ठेवण्यास मदत होते, त्यातच भर म्हणजे गावात असलेली तरुण मंडळी या दोन्ही प्रवेशद्वारांवर पहारा देत असतात. गावात येणाऱ्या आणि गावातून बाहेर जाणाऱ्या गाड्यांचे नंबर लिहुन घेणे, त्यांच्या नंबरप्लेटचे फोटो काढणे आणि गावातल्या व्हॉट्स अॅप ग्रृपमध्ये शेअर करणे, अशामुळे गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती प्रत्येक गावकऱ्याला मिळेल.
वंटास मुंबईचा यामागचा इतकाच उद्देश की राज्यातल्या प्रत्येक गावाने थोडं याप्रमाणे तत्पर राहिलं, तर कोरोनाचा बापदेखील आपल्या गावात एंट्री करणार नाही. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments