कारण

किल्लारी भुकंपात रिअल हिरो ठरलेले, मुंबईतील कोरोनासमोर का हारले?

1993 साली महाराष्ट्रात, लातूर जिल्ह्यातील किल्लारीला भयानक भूकंप झाला होता. म्हणजे आजही तो भूकंप आठवला तर अंगावर काटे येतात. वित्तहानीसह जीवितहानी होऊन अख्खी पंचक्रोशी उध्वस्त झाली होती. त्या गावाची गाडी पुन्हा रुळावर आणून गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्याकाळाचे लातूरचे जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी आणि त्यांच्या साथीला असलेल्या मुख्यमंत्री शरद पवार यांनी केले होते.
आता गेले काही दिवस प्रवीण परदेशी हे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कारभार सांभाळत असताना अचानक त्यांनी राजीनामा दिला आणि चर्चेचा विषय ठरले. किल्लारी भूकंप, सांगली-कोल्हापूर महापूर अशा मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलणाऱ्या प्रवीण परदेशी यांनी कोरोना संकटात मुंबईला साथ द्यायचं सोडून  दिली, त्यानंतर त्यांना लगेचच नगरविकास खात्याच्या अप्पर सचिवपदाचा पदभार घेतल्याचे वृत्त समोर आले, असे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर पुढील माहिती तुमच्यासाठीच…
प्रवीण परदेशी यांनी किल्लारी भूकंपाच्या वेळेस केलेल्या काही योजना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कसा लातूर जिल्हा पूर्वपदावर आला त्याचा आढावा घेऊ…
लातूरच्या किल्लारी भूकंपाचा आढावा
किल्लारी भूकंप झाला तेव्हा शरद पवार हे त्याकाळचे मुख्यमंत्री होते आणि प्रवीण परदेशी हे लातूरचे जिल्हाधिकारी होते. पहाटे चार वाजता भूकंप झाला आणि सगळा काही सत्यानाश झाला. या नैसर्गिक आपत्तीनंतर लोकांना पुन्हा उभे करणे, पुरानंतर पसरणारी रोगराई, पडलेली घरे पुन्हा बांधणे, संसार उभे करण्यासाठी लोकांना बळ देणे हे खूप कठीण काम असते. हे काम त्यावेळी प्रवीण परदेशी यांनी केले. स्वतः लोकांपर्यंत मदत पोहचणे असो वा लोकांचे खचलेले मानसिक संतुलन घट्ट करणे, हे सर्व प्रवीण परदेशी यांनी उत्तमरीत्या हाताळले. घर दुरुस्तीपासून ते लोकांना तीन वेळेच्या जेवणाची सोय करण्याचं काम स्वतः प्रवीण परदेशी यांनी केलं. कमी कालावधीत त्यांनी अनेकांची मदत घेऊन गाव सावरले. अनेक योजनांचा आराखडा तयार करून त्या आमलात आणल्या जसे की
● पावसाळ्याचा तो काळ असल्याने आणि भूकंपात लोकांची घरे गेल्याने, एका महिन्याच्या आत तब्बल पन्नास हजार तात्पुरते शेड्स त्यावेळी उभारण्यात आली होते.
● शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहेसुद्धा उभारण्यात आली होती.
● अनाथ झालेल्या मुलींच्या संभाळासाठी, तेंव्हा परदेशी यांनी नीलम गोरे यांच्या स्त्री आधार केंद्राच्या मदतीने या मुली कुठल्या नातेवाईकांकडे जास्त सुरक्षित राहू शकतात याचा आढावा घेऊन मुलींना त्या त्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं.
● जेंव्हा भूकंप झाला तेंव्हा प्रौढमृताला 50 हजार आणि लहान मृतास 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती.
अशा प्रकारे किल्लारी भूकंपाचे उत्तमरित्या पालकत्व आणि आपली जबाबदारी म्हणून परदेशी यांनी काम पाहिले होते. त्यामुळे आजही किल्लारी गावचे लोक प्रवीण परदेशींना देवस्वरूपाची उपमा देतात…
या सगळ्यावरून आज मुंबईला प्रवीण परदेशीसारख्या अनुभवी योध्दाची गरज असल्याचं म्हटलं जातय. मात्र त्यांनी अचानक झालेली बदली, ही खूप काही सांगुन जाते. कोरोनाच्या संकटात आज मुंबईसारख्या शहराला कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाची फार गरज आहे. किल्लारी भूकंपावेळी नियोजनपुर्वक उत्कृष्ठ कामगिरी बजावणारे परदेशी यांची बदली होणे, म्हणजे मुंबईतील वाढत चाललेल्या कोरोनासमोर हार मानणे, असा अर्थ होईल का? असा प्रश्न उपस्थित होतो.
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई शहरात आहे, दिवसेंदिवस ही आकडेवारी 500 ते 700 च्या फरकाने वाढत आहे. त्यामुळे इथे जागा मिळेल तिथे आयसोलेशन वार्ड उभे केले जात आहेत. मुंबईतील कोरोना कधी संपेल, याची खात्री सध्यातरी कोण देताना दिसत नाही आणि कमी कधी होईल, याची शाश्वती आता देता येत नाही. हे सगळं एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला समोर येऊन ठेपलेलं पावसाचं संकट. कारण प्रत्येक पावसाळ्यात मुंबईमध्ये पाणी साचणे, अनेक ठिकाणी पडझड होणे असे प्रकार घडत असतात. हेदेखील मुंबईसाठी महासंकट असणार आहे, त्यामुळे कोरोनासोबतच अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी पुर्वतयारी करणे खूप गरजेचे आहे, मात्र अशी कोणतीची तयारी या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होताना दिसत नाहीये. नवीन आलेले मुंबईचे नवे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आता या कोरोनाच्या महासंकटातून कशाप्रकारे मुंबईला वाचवतात, हे पाहाणेच गरजेचे असेल.

 

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा, या व्यतिरिक्त कोणत्या विषयाची माहिती तुम्हाला हवी असेल, तर त्याबद्दलही सुचवा, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आग्रही असू.

हेही वाचाच…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments