कारण

‘या’ कारणामुळे नाशिकमधील एकाही पोलिसाला झाली नाही कोरोनाची लागण; पाहा काय आहे नाशिक पॅटर्न

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे आपल्या महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नाश करण्यास कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ होय. 
 
संकट कोणतेही असो, मोठ्या डोंगरासारखे, नागरिक आणि संकटाच्यामध्ये उभे राहाणारे आपले वर्दीतले वीर जवान म्हणजे आपले पोलीस बांधव. आज डोळ्यांनी न दिसणाऱ्या संकटाला सामोरे जात आहेत, आपले अनेक पोलीस बांधव या कोरोना संकटाच्या जाळ्यात अडकलेदेखील आहेत. दुःखी बाब म्हणजे काहींना आपला जीवदेखील सोडावा लागला, तर दिलासा देणारी बातमी म्हणजे काहींनी या कोरोनावर मात केली.
 
महाराष्ट्रातील मुंबईमध्ये अनेक पोलीस बांधव कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू पावल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या, कदाचित नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या या वर्दीतल्या माणसाची काळजी घेण्यास कुठेतरी कमी पडलो असावे. ही झाली आपल्या मुंबईची गोष्ट. दुसरीकडे आपण नाशिक येथील पोलीस बांधवांचा विचार केला तर तिथे एकही पोलिस बांधव हा कोरोना व्हायरसला बळी पडला नाही.
 
कसा झाला हा चमत्कार, काय आहे या मागचे रहस्य आणि कशाप्रकारे करण्यात आले नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत वंटास मुंबईच्या या खास रिपोर्टमधून.
 
नाशिक पोलिसांनी स्वतःला ठेवले कोरोनापासून लांब
 
● नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनापासून आपल्या पोलीस बांधवांचे रक्षण कसे केले जाईल यावर पोलीस यंत्रणा सर्वप्रथम काम करू लागली.
 
● विशेष म्हणजे मार्च महिन्यापासूनच त्यांनी संपूर्ण योजना आखून त्याप्रमाणे पुढील तयारी सुरू केली. 
 
● कोरोनाला हरवायचे असेल तर शरीरातील इम्युनिटी सिस्टीम बळकट करणे आवश्यक असते. नाशिक पोलिसांनी हेच सूत्र अवलंबून कोरोनाला स्वतः पासून दूर ठेवले.
 
● पुरेशी विश्रांती ही गरजेची असते. याच अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त तसेच पोलीस महासंचालकांचे मार्गदर्शन घेऊन पोलीस बांधवांची ड्युटी ही 12 तासावरून 8 तास केली, जेणेकरून उरलेले 16 तास ते पुर्णतः विश्रांती घेऊन त्यांचे शरीर सुदृढ राहील.
 
● पुरेशा विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी पोलीस आपले काम करण्यास सर्वत्तोपरी सक्षम असतील, हा त्यामागचा उद्देश.
 
● नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या म्हणण्यानुसार अवेअरनेस, एज्युकेशन अँड एनफोर्समेंट म्हणजेच जागरूकता, शिक्षण आणि अंमलबजावणी या टप्प्यावर काम केले गेले. 
 
● कोरोना संकटाच्या काळात पोलीस बांधवांचे मानसिक आरोग्य व नैतिकता चांगली ठेवण्यासाठी वारंवार चर्चा करून त्यांना मानसिकदृष्ट्या खंभीर बनविण्याचे काम करण्यात आले. 
 
● योग्य व पुरेसा आहार लक्षात घेता, प्रशासन तसेच अनेक खाजगी कंपनी मार्फत पोलीस बांधवांना ड्राय-फ्रुईट्स, चवनप्राश, सी-व्हिटॅमिनच्या गोळ्या तसेच सरकारच्या अधिसूचने मार्फत अर्सेनिक होमिओपॅथी मेडिसिन वाटप करण्यात आले.
 
● या सर्व गोष्टी पोलीस फोर्स अधिक सक्षम बनविण्यास मदत करत असल्याचे नाशिक पोलीस अधिकारी सांगतात. 
 
● कोरोनाचे मूळ लक्षण म्हणजे घसा खवखवणे तसेच सर्दी, ताप यांचा विचार करून सर्व पोलीस बांधवांना गरम पाणी पिणे बंधनकारक करण्यात आले.
 
● नाशिक पोलीस प्रशासनातर्फे गरम पाणी करणाऱ्या 200 इलेक्ट्रॉनिक किटल्या खरेदी करून ज्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.
 
● अनेक खाजगी संस्था तसेच पोलीस प्रशासनातर्फे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला पीपीई किट, सॅनिटीझर तसेच मास्क वाटप करण्यात आले आहेत.
 
● पोलिसांच्या गाड्या सॅनिटायझ करणे, डिसीनफेक्ट करणे गरजेचे असल्याचे सांगून वेळोवेळी ते करण्यात आले. 
 

अभिनेता अक्षय कुमारची लाभली साथ

एका वृत्तसंस्थेशी बोलताना नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अक्षय कुमारचे आभार मानले. नाशिक पोलिसांना कोरोनापासून दूर ठेवण्यास आमच्या योजनांसोबत अभिनेता अक्षय कुमारची देखील चांगली साथ लाभल्याचे ते सांगतात. अभिनेता अक्षय कुमारने नाशिक पोलीसांसाठी 500 डिजिटल वॉच देऊ केले. 
 
● या स्मार्ट डिजिटल वॉचमध्ये शरीराचे तापमान 24 तासांमध्ये 36 वेळा मोजले जाते.
 
● ब्लड प्रेशर तसेच हार्टबीट हे डिजिटल वॉचमध्ये मोजले जातात.
 
● रात्री झोप किती झाली याचा स्लिप पॅटर्न हा डिजिटल वॉच दर्शवतो.
 
● तसेच शरीरातील कॅलरीज किती बर्न झाल्या हेदेखील त्याच्यात दाखवले जाते.
 
● एका विशिष्ट मोबाईल अँपद्वारे हे स्मार्ट डिजिटल वॉच आणि पोलीस कंट्रोल रूम जोडली जाते, जेणेकरून काही कमी असल्यास कंट्रोल रूम जागृत होऊन सदर पोलीस बांधवास तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करते. 
 
मित्रांनो, अत्यंत नियोजित पध्दतीने आणि चतुराईने पोलीस बांधवांच्या हितासाठी ही योजना आखली गेली, तशी अंमलबजावणीदेखील केली गेली. यासगळ्याचा परिणाम इतकाच की आपल्याला नाशिकमध्ये एकाही पोलीस बांधवाला कोरोनाची लागण झाली नाही.
 
तसे मुंबईमध्ये का करता आले नाही? असा प्रश्नही आपल्यासमोर उभा राहत असलेच, तर इथली भौगोलिक परिस्थिती, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या, मुंबईच राहणीमान असे मुद्दे समोर येतात. नाशिक पॅटर्न मुंबईत राबवणे जरी कठीण असलं, तरी इथली परिस्थिती पाहून तो पॅटर्न इथे लवकरात लवकर राबवणे, गरजेचे आहे.
 
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशा अनेक पोस्टसाठी आमच्या फेसबुक, युट्यूब, ट्विटर, हेलो या सोशल मिडीयाला भेट द्या.

हेही वाचाच…
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments