कारण

महाराष्ट्रात प्रत्येक अडचणीच्या वेळी NDRF मदतीला असते; नेमकं काय विशेष असतं यामध्ये? वाचा सविस्तर

अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येणाऱ्या वादळाचं रूपांतर चक्रीवादळात होऊन ते महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचले आणि ते हळूहळू पुढे सरकत गेले. राज्यातील प्रत्येक नागरिक त्याचा साक्षीदार झाला. सध्या सुरू असलेल्या चक्रीवादळास “निसर्ग सायक्लॉन” असे नाव देण्यात आले आहे. वादळाच रौद्ररूप काय असू शकते, याची झलक आपण काल (3 जून 2020रोजी) पाहिली असावीच.
प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे पथक नेमलेले असते. सुरक्षेच्या दृष्टीने या चक्रीवादळासाठी देखील NDRF ची तुकडी तैनात करण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले. आता NDRF हे नाव आपण अनेकदा मोठ्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी ऐकतो. नक्की यामागील इतिहास काय? मोठ्या संकटाच्या वेळी का NDRF ची निवड केली जाते? काय आहे नक्की NDRF; हे सर्व आज आपण वंटास मुंबईच्या विशेष वृत्तांतात पाहाणार आहोत.
मोठ्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी NDRF ची तुकडी तैनात केली जाते, नुकतेच मागील वर्षी कोल्हापूर, सांगली महापुरात NDRF ला पाचारण करण्यात आले होते. तसेच मुंबईतील मुंब्रा इमारत दुर्घटना असो की महाराष्ट्रातील तिवरे धरणफुटी, माळीण भूस्खलन यांसारख्या आपत्ती परिस्थितीत  NDRF ने आपले काम चोख बजावले. विशेष म्हणजे NDRF पथकांनी आजपर्यंत हजारो जीव वाचविले आहेत.

NDRF म्हणजे नक्की काय ?

NDRF [National Disaster Response Force] म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक. 2005 साली भारत देशातील आपत्तींशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. त्या कायद्याला अनुसरून 2006 मध्ये NDRF ची स्थापना करण्यात आली व याचे सर्व कामकाज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या पथकाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आपत्तीनंतर वा त्या काळात बचावकार्याची मोहीम NDRF कडे असते. “आपदा सेवा सदैव” हे ब्रीदवाक्य घेऊन NDRF  कार्यरत असते.

कशी असते NDRF ची टीम ?

सुरुवातीला NDRF पथकाच्या देशभरात 8 छावण्या होत्या. त्या आता वाढवुन 12 करण्यात आल्या आहेत. एका छावणीमध्ये 1,149 अधिकारी आणि जवान कार्यरत असतात. प्रत्येक छावणीमध्ये एक विशिष्ट तुकडी असते.
 
यामध्ये प्रत्येक तुकडीमध्ये 45 जवान असतात जे अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वाड आणि आरोग्यसेवेसाठी विशेषरित्या प्रशिक्षित असतात. सरकारच्या निर्देशनानुसार NDRF या पथकाला राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच स्थानिक पातळीवर कार्य करण्यासाठी तयार करण्याचे निर्देश दिले जातात. आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण 18 तुकड्या असून त्यातील 3 तुकड्या मुंबईत, 14 पुण्यातील मुख्यालयात तर 1 तुकडी नागपूरमध्ये असते. भारतातील या NDRF पथकाने देश तसेच  विदेशात आतापर्यंत अनेक बचावकार्यांमध्ये सहभाग घेतला असून आतापर्यंत सुमारे 4 लाख 70 हजारांहून अधिक नागरिकांचा जीव वाचविला आहे.
NDRF पथकाच्या प्रशिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर, भारतातील केंद्रीय पोलीस सेवेतील विविध उपसंस्थांमध्ये निवड झालेल्या जवानांना प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून NDRF पथकामध्ये निवडण्यात येते. हा प्रतिनियुक्तीचा कालावधी 7 ते  9 वर्षं इतका असू शकतो. BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB यांसारख्या पथकांतील जवानांची यामध्ये निवड करण्यात येते. निवड झालेल्या जवानांना 19 आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. तसेच, प्रशिक्षणादरम्यान निवडक जवानांना आरोग्य, पूरपरिस्थिती, पाण्यासंबंधित आपत्ती, उंच इमारतींतील बचावकार्य, मानवी तसेच प्राण्याच्या मृतदेहांचे व्यवस्थान, विल्हेवाट लावणे, रासायनिक, जैविक आण्विक आणि किरणोत्सारी आपत्ती, पर्वतांमधील लोकांच्या बचावार्थ या सर्व नैसर्गिक तसेच आपत्कालीन संकटांना सामोरे कसे जायचे याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.
मुख्य बाब म्हणजे NDRF केवळ आपत्कालीन परिस्थितीत लोकांना वाचविण्याचे काम करत नसून लोकांना एखाद्या आपत्ती प्रसंगी काय दक्षता घ्यावी, कशाप्रकारे स्वतःची काळजी घ्यावी, याचीदेखील माहिती पुरविण्याचे काम हे करते. यासाठी त्यांना राज्य तसेच स्थानिक आपत्ती निवारण संस्थांकडून प्रशिक्षण दिले जाते.
वंटास मुंबईचा हा खास लेेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा, तसेच आमच्या इतर सोशल मीडियाशी  खास माहितींसाठी जोडले जा.
वाचाच वाचाच…
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments