आपलं शहर

70 टक्के मुंबई कोरोनामुक्त झाली; आयुक्तांनी सांगितलं यामागचं मोठं कारण…

मुंबईत कोरोनारुग्णांचा वाढता आकडा कमी होत चालला असताना कोरोनामुक्त रुग्णांची सरासरी ही 70 टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. म्हणजेच, उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मुंबईला संपूर्णपणे कोरोना विळख्यातून काढणे कधी शक्य होईल याची शाश्वती अद्याप कोणीही देऊ शकत नसले तरी सरकार, प्रशासन तसेच नागरिकांच्या मदतीने हळूहळू मुंबई कोरोनाला आपल्या मुठीत ठेवायला यशस्वी होत आहे. हे सर्व कसे शक्य आहे, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या वंटास मुंबईच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यावर काय सांगतात महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह?
कोरोना परिस्थितीवर मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या एकूण माहितीनुसार, सर्वात आधी कंटेन्मेंट झोन क्षेत्रांचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. त्यानंतर चेस द व्हायरस म्हणजेच विषाणूचा पाठलाग या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहिमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोदारी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबीरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधी साठा उपलब्ध करुन त्याआधारे उपचारांवर भर देणे, अशा उपाययोजनांनी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणायला मदत होते आहे. या सर्व उपाययोजना योग्य पद्धतीने आखून त्याची अंमलबजावणी देखील होत असल्याचे आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, असं आयुक्तांनी सांगितलं.

मिशन झिरोचा मोठा परिणाम!
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाशी लढा देण्यासाठी “मिशन झिरो” हा अॅक्शन प्लान तयार केला आणि त्या प्रमाणे पुढील कामास सुरुवात करण्यात आली. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या फार मोठी असताना कोरोना साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘मिशन झिरो’ ही संकल्पना 22 जून 2020 रोजी सुरू केली. सुरुवातीला मुंबईतील बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली, भांडुप, आणि मुलुंड या सहा विभागांमध्ये “मिशन झिरो” राबवण्यात आले. रुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्यासाठी 50 फिरत्या दवाखान्यांची व्यवस्था करण्यात आली.

या उपक्रमासाठी भारतीय जैन संघटना, क्रेडाई -एमसीएचआय, देश अपनाये, बिल गेटस् फाऊंडेशन या संस्थांची मदत होणार होती. कोरोना बाधित रुग्णाची माहिती मिळताच तेथे जाऊन औषधे देणे, कोरोना संशयित रुग्णांना त्वरीत वेगळे करुन कोविड टेस्ट करणे तसेच आजूबाजूच्या परिसरात कोरोनाविषयीची जनजागृती करणे हे मिशन झिरोचे मुख्य उद्दिष्ट होते.

आताची मुंबईची परिस्थिती?
कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सातत्याने बदल होत असले तरी, मुंबईची परिस्थिती मुठीत काबू करण्यास प्रशासनाला फार प्रमाणात यश मिळाले आहे. महानगरपालिकेकडून कोरोना चाचण्यांची दैनंदिन क्षमता पूर्वीच्या सरासरीनुसार 4 हजारांवरून आता 6 हजारापर्यंत वाढविण्यात आली आहे. यामधून ज्या दिवशी कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली, त्याचा परिणाम हा कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सुखद बाब म्हणजे टेस्टिंगमुळे कोरोना संक्रमित रुग्णांवर लवकर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आल्याने मृत्यूदरात घट झाली.

मुंबईत जनजागृती करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी उभारलेली कोरोना काळजी केंद्र व कोरोना आरोग्य केंद्र यामुळे उपचार सुविधांचे विकेंद्रीकरण झाले. तसेच, मुंबईत डॉक्टरांच्या लिखित प्रपत्राशिवाय चाचणी करुन घेण्याची मुभा मिळाल्यामुळे नागरिक कोरोनाला धरून सहज आपल्या मनातील भीती दूर करू शकतात.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा. अजून अशा काही ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी सोबतच वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाला नक्की भेट द्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments