आपलं शहर

वाडीया रूग्णालयात साकारला ‘चॉकलेटचा बाप्पा’; बाल कर्करूग्णांचा अद्भुत गणेशोत्सव…

गणेशोत्सव म्हणजे लहान मुलांचा आवडता सण. बाप्पा येणार, आगमनाची तयारी, मोदक खायला मिळणार आणि नुसता धुमधडाका. सर्व छोटे भक्तजण आपापल्या पध्दतीने लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे स्वागत करत असतात. यंदाचा गणेशोत्सव काहीसा वेगळ्या प्रकारे शांततेत व गर्दी न करता साजरा केला जात आहे. यातच, एक अनोखा गणेशोत्सव परळ येथील वाडीया रुग्णालयात साजरा करण्यात आला आहे. वाडीया रूग्णालयातील बालकर्करूग्णांनी एका अनोख्या पद्धतीने गणरायाचे स्वागत केले आहे. या लहानग्या बालकांनी आपल्या प्रिय बाप्पाची चॉकलेटची मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारली आहे. तसेच, या अनोख्या गणेशोत्सव माध्यमातून ‘पर्यावरणाचे रक्षण करा’ असाही संदेश दिला आहे.

लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वात जास्त उत्सुकता असते ती म्हणजे बच्चे कंपनीला, बाप्पाच्या स्वागतासाठी बाल भक्तांचा नेहमीच पुढाकार पहायला मिळतो. परंतु, काही लहान मुलं अशीदेखील आहेत जी आपल्या आजारामुळे गणेशोत्सव साजरा करू शकत नाहीत.

कर्करोग झालेल्या वाडीया रुग्णालयातील अनेक लहान मुलांना इच्छा असूनही आजारपणामुळे हा सण उत्साहाने साजरा करता येत नाही. त्यांच्या आनंदावर कर्करोगाचे सावट फिरत आहे. पण, आजारातूनही या बालभक्तांनी आपल्या आनंदाचा मार्ग शोधत बाप्पाची भक्ती केली. स्वतःच्या हाताने मूर्ती साकारत, सरकारच्या नियांनाचे पालनदेखील केले. या लहान भक्तांच्या कामगिरीतून, नक्कीच परिस्थितीवर मात करत शिकण्याची ऊर्जा मिळते.

वाडीया रुग्णालयातील कर्करोग झालेल्या या मुलांना त्यांच्या खेळण्याच्या वयातच कर्करोगासारख्या भयानक आजाराने कवटाळले. कर्करोगाचं निदान झाल्यानं या मुलांना केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांसारख्या वेदनादायी उपचारपद्धतीतून जावं लागतं. याशिवाय, अन्य राज्यातून कर्करोगाची लागण झालेले रूग्ण उपचारासाठी मुंबईत येत असल्याने उपचार होईपर्यंत ते इथेच राहतात. आपल्या आजाराच्या दुःखात त्यांना कोणताही सण त्यांच्या कुटुंबियांसह साजरा करता येत नाही. या सर्व बाबी लक्षात घेत, बाल कर्करूग्णांना गणेशोत्सवाच्या सणात सहभागी होता यावं, यासाठी वाडीया रूग्णालयात अनोख्या गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या अनोख्या गणेशोत्सवामुळे स्वतःच्या वेदना विसरून काही क्षणासाठी मुलांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे आणि आनंदाचे हसू फुलले होते.

‘‘यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सर्वत्र अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा रूग्णालयात गणेशाची स्थापना केली आहे. सध्या रूग्णालयात अनेक बाल कर्करूग्णांवर उपचार सुरू आहेत. दुरहून रूग्ण उपचारासाठी येत असल्याने ते या ठिकाणीच राहतात. या लहान मुलांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. पण आजाराने कोलमडून न जाता त्यांना ध्यैर्याने तोंड देण्यासाठी खास या मुलांसाठी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बाल कर्करूग्णांनी चॉकलेट पासून बाप्पाची मूर्ती साकारली आहे. अशी माहिती वाडिया रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.

‘‘बाप्पासाठी सुरेख असा देखावा ही साकारण्यात आला आहे. यात मुलांनी पर्यावरणासंबधी अनेक चित्र काढले आहेत. यासाठी गणपतीसाठी मोदकाचा नैवेदय ही ठेवण्यात आला आहे. हा सण साजरा करताना अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. तसेच आम्ही या मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना आयुष्यभर लक्षात राहील, अशा संस्मरणीय आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय’’, असेही डॉ. बोधनवाला म्हणाल्या.

माणसाने दुःखात आनंदाचा मार्ग कसा शोधावा हे आज या बालभक्तांनी दाखवून दिले आहे. गणपती बाप्पा त्यांच्या बालभक्तांना लवकर बरे करो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments