आपलं शहर

यंदा मुंबईत अशी साजरी होत आहे दहीहंडी…

गोविंदा आला रे आला… हे गाणं म्हणायला तेव्हाच जोश येतो, जेव्हा आपले बाल गोपाल, गोविंदा दही हंडी फोडण्यासाठी गगनभरारी घेतात. दहीहंडी म्हटलं की, मुंबईकर नुसत्या फिरतीवर. हजारो, लाखो रुपयांची मोठ्यात मोठी दहीहंडी लागते आणि नको इतकी मुंबईकरांची गर्दी जमते. गोविंदा पथकांची चढाओढ, ढाक्कु माकुम-ढाक्कू माकुम, “बोल बजरंग, बली की जय” सारखी गाणी अंगात जोश निर्माण करतात. पण खरंच कोरोना संकटाच्या काळात मुंबईकरांच्या डोळ्यांना हे चित्र दिसणार का? तर याचे स्पष्ट उत्तर म्हणजे नाहीच! कोरोनाच्या सावटामुळे सद्यस्थिती लक्षात घेता दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले आहेत. आता मग गोविंदा पथके काय करणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचे सविस्तर उत्तर देत वंटास मुंबई तुमच्यासाठी दहीहंडी विशेष, हा लेख घेऊन आली आहे.

सरकारने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी दिली. समाजाचे भान ठेवत, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाला जास्त खर्च न करता अनेक आरोग्यविषयक शिबिर राबविण्याचा उपक्रम हाथी घेतला आहे. संकट समयी आपल्या लोकांच्या सोबत आणि लोकांसाठी काम करणारी आपली मुंबई आणि तेथील मुंबईकर. हाच फॉर्म्युला बालगोपाल गोविंदांनी यावर्षी दहीहंडीसाठी लागू केला. यावर्षी दहीहंडी साजरी होत नाही म्हणून काय झालं, गोविंदा सामाजिक भान ठेवत यंदा प्रदूषण मुक्त व स्वच्छ मुंबईसाठी उपक्रम राबवत आहोत, अशी भावना गोविंदांनी व्यक्त केली.

दरवर्षी अनेक शहरातील नागरिक मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाची मजा लुटण्यासाठी येत असतात. मुंबईसह ठाण्यामध्ये दरवर्षी मोठ मोठ्या दहिहंडीचे आयोजन केले जाते. डोळे मोठे करणाच्या आकड्यांची बक्षिसे देखील ठेवली जातात. यातच खास म्हणजे अनेक सिनेतारकांना आमंत्रण देखील असते, त्यामुळे चाहता वर्ग गर्दी करतोच. दहीहंडी उत्सवाच्या काही महिने अगोदरपासून गोविंदा पथके दहीहंडी फोडण्याचा सराव करत असतात. मात्र, यावर्षी अस काहीही चित्र आपल्याला पाहायला मिळणार नाही. राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून, मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घेऊनही मुंबई, ठाणे या सारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्ण कमी होताना दिसत नाही. त्यातच दहीहंडी उत्सव रद्द करण्यात  आला. आता समाजाप्रति आपले देणं समजून दहीहंडी उत्सव पर्यावरण व मुंबईला स्वच्छ करण्यासाठी समर्पित करावा, असे अनेकांनी ठरवलं आहे.

अशातच जगप्रसिद्ध असलेल्या मुंबई जोगेश्वरीतील “जय जवान गोविंदा पथक” मंडळाने यंदा कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा करता येणार नाही, त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून त्यांनी “स्वच्छ मुंबई, प्रदूषण व मुक्त मुंबई” असा नारा देत घरोघरी जाऊन प्लास्टिक टाकाऊ साहित्य गोळा करून ते ‘आकार संस्था मुंबई’ यांना देऊन प्लास्टिक पुनर्चक्रण करून त्याचा काही वस्तू बनवून व  प्लास्टिक पुनर्चक्रणाची विक्री करून  गरिबांना मदत करणार आहेत. त्यामुळे आम्हाला सर्व मुंबईकरांनी मदत करा,असे आवाहन जय जवान गोविंदा पथकाचे अध्यक्ष संदीप ढवळे यांनी दिली.

जय जवान गोविंदा पथकाने यंदा कोरोनाच्या संकटामुळे दहिहंडी न फोडण्याचा निर्णय घेतला, खरा पण त्यामुळे गोविंदा घरीच राहणार आहेत. यामुळे गोविंदा नाराज होते, मात्र मंडळाने एकत्र येत विचार करत हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. त्यामुळे गोविंदांनादेखील आनंद झाला आहे. मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी व इतर भागातून आम्हाला लोकांकडून व अनेक मंडळाकडून चांगल्या प्रमाणात प्रतिसाद   मिळत असल्याचं गोविंदा पथकाचे सदस्य सांगत आहेत. आतपर्यंत 1 टन प्लास्टिक जमा झालं आहे. पुढेदेखील असंच काम सुरू ठेवणार आहोत, असे देखील अध्यक्ष ढवळे यांनी सांगितले.

दहीहंडी म्हटली की, सगळ्यांचे लक्ष असते जोगेश्वरी इथल्या जय जवान गोविंदा पथकाकडे. दरवर्षी नवनवे विक्रम आपल्या नावे कोरणाऱ्या या गोविंदा पथकाने यावर्षी देखील 10 थर लावत नवा इतिहास रचण्याचा निर्धार केला होता. मात्र तो कोरोनामुळे शक्य झालं नाही; पण त्यांचा “स्वच्छ मुंबई व प्रदूषण मुक्त मुंबई”च्या उपक्रमाची चर्चा दहा थर लावण्यापेक्षा अधिक आहे.

कसा वाटला तुम्हाला हा लेख हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा तसेच, अधिक माहितीसाठी वंटास मुंबईच्या इतर सोशल मीडियाला देखील फॉलो करा. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments