खूप काही

Inside The Crime |04| सीटखालच्या रक्त लागलेल्या रुमालामुळे सिध्दार्थ संघवीच्या खून्याचा शोध लागला…

ठाण्यातल्या एका निर्जन स्थळी कमरेभर गवतात एक कुजलेला मृतदेह नागरिकांना आढळला होता. हा मृतदेह सिध्दार्थच्या चेहऱ्याशी मिळताजुळता होता. ठाणे ग्रामीण पोलिसांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याची माहिती दिली होती, लागलीच पोलिसांचे एक पथक तिकडे रवाना झाले. मृतदेहाची ओळख पटली होती आणि तो मृतदेह होता सिध्दार्थ संघवीचा.

आतापर्यंतच्या तपासाने पोलिसांना आणखीनच बुचकळ्यात टाकले होते. सिध्दार्थची गाडी नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात सापडली होती, तर दुसरीकडे तिथून कित्येक किलोमीटर लांब असलेल्या ठिकाणी सिध्दार्थचा मृतदेह सापडला होता. जर गाडीत हत्या करण्यात आली आणि गाडीत लाल रंगाचे रक्ताचे डाग आहेत, तर सिध्दार्थचा मृतदेह ठाण्यात कसा पोहोचला, हा सगळ्यात मोठा प्रश्न पोलिसांना पडला होता. यादरम्यान सिध्दार्थच्या गाडीत त्यादिवशी सापडलेला रुमाल आणि त्यावर असणार्‍या ठशांचा रिपोर्ट पोलिसांच्या हातात पडला आणि यावरून पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगाराचा शोध सुरू केला.

पोलिसांच्या हाती लागलेल्या ठशांच्या रिपोर्टवरून एक आरोपी पोलिसांच्या नजरेसमोर येत होता. पैशांसाठी दरोडे घालणारा बबलू यादव हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार. याचेच रक्ताने माखलेल्या रुमालावर ठसे होते. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांचे जाळं कामाला लावलं. काही झाले तरी बबलू यादवचा शोध घेणे पोलिसांना भाग होतं. नवी मुंबईतल्या एका परिसरात बबलू यादव आपल्या मित्रासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने तिथे धाव घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.

सुरुवातीला त्याच्या तोंडातून काहीच बाहेर पडत नव्हतं; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. बबलू यादव काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर पडला होता. त्याच्या हातात काही काम नव्हतं. कामासाठी भटकणाऱ्या बबलू यादवला रोजचा खर्च कसा भागवायचा याची चिंता सतावत होती. त्यादिवशी सिध्दार्थ संगवी बँकेतून बाहेर पडला. मात्र त्याच आवारात एखाद्या व्यक्तीला हेरून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे घ्यायचं आणि तिथून निसटायचं असा कट बबलूने आखला होता.

तब्बल दोन तास योग्य ते सावज हातात न आल्याने बबलू पार्किंग विभागात लपून बसला होता. पार्किंगमध्ये येणारा एखादा व्यक्ती हातात येईल आणि आपण त्याला हेरून धमकावू असा प्लॅन बबलुच्या डोक्यात होता. त्याच वेळी आपल्या गाडीच्या दिशेने सिध्दार्थ येताना त्याला दिसला त्याने सिध्दार्थच्या चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली मात्र सिध्दार्थने देण्यास नकार दिला.

दोघांमध्ये झटापटी झाली आणि अचानक एक वार सिध्दार्थच्या गळ्यावर झाला. वार इतका खोलवर होता की पुढच्या 30 सेकंदात सिध्दार्थने तडफडून स्वतःचाच गाडीच्या अगदी बाजूला प्राण सोडला. घाबरलेल्या बबलुने सिध्दार्थचा मृतदेह गाडीत कोंबला आणि चावी घेऊन भरधाव वेगाने गाडी तिथून बाहेर काढली. त्या दिवशी गाडी भरधाव वेगाने बाहेर पडल्यानंतर वॉचमन गोंधळात पडण्याच कारण हेच होतं की गाडी नेहमीप्रमाणे सिध्दार्थ चालवत न्हवता. तर त्याजागी एक खुनी आपलं कृत्य लपवण्यासाठी धावत होता.

आरोपी बबलू यादव ने पहिल्यांदा गाडी ठाण्यात एका निर्जन स्थळी नेली आणि सिध्दार्थचा मृतदेह गाडीतून काढून बाहेर फेकला. त्यानंतर त्याने सरळ नवी मुंबईतलं कोलरखैरणे गाठलं; पण खून झाल्यानंतर हातावरचे रक्ताचे डाग पुसण्यासाठी वापरलेला रुमाल चुकून त्याने गाडीतच फेकला होता. त्याने कोपरखैरणे परिसरात निर्जन स्थळी गाडी पार्क केली आणि तिथून पोबारा केला. आपण सुटलो आपण सगळे पुरावे नष्ट केलेत या आनंदात तो होता; पण एका रुमालाने बबलुचा घात केला आणि त्याच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश झाला. आरोपी बबलू यादव सध्या तुरुंगात शिक्षा भोगतोय.

पोलिसांनी या थरारक गुन्ह्याचा तपास अगदी शिताफीने करत आरोपीला गजाआड केलंय; पण एचडीएफसी बँकेची जागा रिकामी झाली आणि डावलण्यात आलेल्या अधिकाऱ्याला ती जागा मिळाली. बबलू यादवने सिध्दार्थचा खून केला तो पैशासाठी केला का? सिध्दार्थलाच त्याने का निवडलं? सिध्दार्थबद्दल त्याला कोणी महिती दिली होती का? सिध्दार्थचा कोणी काटा काढला का, असे सगळी प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. नाहीतर अगदी कमी उंचीचा एकटा बबलू यादव धष्टपुष्ट असणाऱ्या सिध्दार्थचा खून करून पुरावे नष्ट करतो, हे न पचण्यासारखचं आहे. या सगळ्या गोष्टी अद्यापतरी अनुत्तरित आहेत.

समाप्त…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments