एकदम जुनं

ज्या मुंबईवरून वाद निर्माण झालाय ती बाबासाहेबांनी महाराष्ट्राला कशी मिळवली ?

एकोणिशेच्या काळात, संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापूर्वी मुंबईवरून वाद पेटला आणि मुंबई नक्की कुणाची हा मोठा प्रश्न सर्व स्तरावरून उपस्थित करण्यात आला. यावर दोन गोष्टी होत्या, मुंबई महाराष्ट्राची की लगतच्या गुजरातची अश्या दाट चर्चांना उधाण आले. यावर, अनेक विध्वंश मुंबई गुजरातची किंवा स्वतंत्र अशी भूमिका मांडत होते. या सगळ्या वादाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तरले आणि मुंबई महाराष्ट्राचीच असे सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केले. आता ते कसे केले, नक्की कोणते पुरावे सादर केले, एवढा मोठा वाद त्यांच्यामुळे मिटला का हे सगळं आपण या वंटास मुंबईच्या खास लेखातून जाणून घेणार आहोत.

बाबासाहेबांनी मुंबई पुराव्यानिशी महाराष्ट्रास मिळवून दिली
मुंबई कुणाची अश्या वादाला तोंड देत, बाबासाहेबांनी 1948,1953 आणि 1955 साली या विषयावर संशोधनपर लेखन केले. बाबासाहेब मोठे महान व्यक्ती, अत्यंत बुद्धिमान आणि चलाख वृत्तीचे, त्यांनी ताकदीचे संशोधन, पुराव्यांचे बळ, साधार-तर्कशुद्ध युक्तिवाद केला जेणेकरून ते मुंबई महाराष्ट्राची आहे हे सिद्ध करता येईल. बाबासाहेबांनी महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करण्याऱ्या लोकांना सडेतोड उत्तर देत त्यांची मुख टाळेबंदीच केली तर दुसरीकडे, मुंबई ना महाराष्ट्राला ना गुजरातला, ती स्वतंत्रच हवी असे असे दावे करणाऱ्या मंडळींना चांगलंच उत्तर दिलं. सर्वांना शांत करण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्या समोर नऊ प्रश्न उभे केले.

1) मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे?

2) मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता?

3) मराठी भाषिकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल?

4) काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे?

5) मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकटय़ा महाराष्ट्राचे नाही, तर ते सर्व हिंदुस्थानचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?

6) मुंबईचा व्यापार-उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे?

7) मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे यासाठी महाराष्ट्र मुंबईवर दावा करतोय हे खरे आहे काय?

8) बहुभाषिक राज्य चांगले असते. कारण तिथे अल्पसंख्याक भाषिकांना अभय असते हे बरोबर आहे काय?

9) राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय?

या सर्व प्रश्नांची उत्तरे देत असताना, बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले.

चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऐतिहासिक पुरावे सांगतात की, गुजरातवर मराठय़ांनी राज्य केले, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेले नाही. अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, गुजरातचे नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही, म्हणून मधला काही काळ मुंबई मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही.

बाबासाहेब पुढे म्हणतात, 1941 च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषिकांची लोकसंख्या 51 टक्के होती, आहे. ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून साऱया हिंदुस्थानातून लोक रोजगार, व्यापार, उदीम यासाठी मुंबईत आले, वसले, त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले हा त्यांचा गुन्हा झाला काय?

बाबासाहेबांनी हे सिद्ध केले की, गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत, तर गुजरातचे आहेत. जसे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच मुंबईत स्वतःहून आले तसे गुजराती आलेले नाहीत, तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ-दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले. ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱयांबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. 1671 सालचे म्हणजे शिवरायांच्या काळातले हे करारपत्र आहे. शिवाय महाजन सभा आणि ब्रिटिश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला. त्यानुसार गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गोदाम अणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमीन देण्यात आली. व्यापारात कर सवलत देण्यात आली. जहाजे आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आले. तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत. याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या वर्मी लागला.

मुंबईत जसा त्यांनी व्यापार-उदीम केला तसाच तो त्यांनी कोलकत्याला केलेला आहे. शिवाय बिहारच्या खाणीतही ते मालक आहेत. म्हणून कोलकता किंवा खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय?

असे सगळे पुराव्यांचे बळ, संशोधनाची ताकद आणि साधार, तर्कशुद्ध युक्तिवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली आणि तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments