आपलं शहर

मास्‍क नसल्‍यास ‘बेस्‍ट बस’ सह टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये प्रवेश न देण्‍याचे आदेश

‘कोविड-१९’ या संसर्गजन्‍य आजारावर नियंत्रण मिळविण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महापालिकेद्वारे करण्‍यात येत असलेल्‍या विविध स्‍तरीय कार्यवाही अंतर्गत ‘विना मास्‍क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्‍मक कारवाई अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्‍त श्री. इक्‍बाल सिंह चहल यांनी आज दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित करण्‍यात आलेल्‍या महापालिकेच्‍या अति वरिष्‍ठ अधिका-यांच्‍या बैठकी दरम्‍यान दिले आहेत. या अंतर्गत बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्‍याचे निर्देश दिले आहेत. त्‍याचबरोबर सर्व बसेस, टॅक्‍सी, रिक्षा इत्‍यादींवर देखील याच आशयाचे स्‍टीकर्स लावण्‍याचे निर्देश देण्‍यात आले असून, या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍याचे निर्देशही महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत.

तोंड व नाक योग्‍यप्रकारे झाकले जाईल, अशाप्रकारे मास्‍क अर्थात मुखपट्टीचा वापर करणे, हा ‘कोविड-१९’ या संसर्गजन्‍य आजाराला प्रतिबंध करण्‍याचा सर्वांत प्रभावी उपाय असल्‍याचे आरोग्‍य व वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील तज्‍ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात देखील नागरिकांद्वारे मास्‍कचा सुयोग्‍य व परिपूर्ण वापर व्‍हावा, यासाठी बृहन्‍मुंबई महापालिका सातत्‍याने जनजागृतीपर कार्यवाही करीत आहे. त्‍याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्‍क योग्‍यप्रकारे परिधान न करणाऱयांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये २००/- यानुसार दंडात्‍मक कारवाईदेखील यापूर्वीच सुरु करण्‍यात आली आहे.

ही कारवाई अधिक व्‍यापक व अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्‍त श्री. इक्‍बाल सिंह चहल यांनी आज दिले आहेत. यानुसार आता लवकरच महापालिका क्षेत्रातील कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी निर्देश फलक बसविण्‍यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही तात्‍काळ सुरु करण्‍याचे आदेश महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत. त्‍याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेतील बसेस, रिक्षा, टॅक्‍सी इत्‍यादींवर देखील ‘मास्‍क नसल्‍यास प्रवेश मिळणार नाह‍ी’, अशा आशयाचा मजकूर असणारे स्‍टीकर्स लावण्‍याचे निर्देश दिले आहेत.

महापालिका आयुक्‍त श्री. इक्‍बाल सिंह चहल यांच्‍या मार्गदर्शनात आज दूरदृश्‍य प्रणालीद्वारे संपन्‍न झालेल्‍या बैठकीला अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्‍यासह महापालिकेचे सह आयुक्‍त, उप आयुक्‍त, सहाय्यक आयुक्‍त, महापालिका रुग्‍णालयांचे अधिष्‍ठाता, सार्वजनिक आरोग्‍य खात्‍यातील वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्‍या विविध विभागांचे अति वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments