खूप काही

प्रश्न डॉ. बाबासाहेबांच्या समतेचा आणि समानतेचा!

 

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करतो तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार होते. त्या विचार तत्वाला ध्यानात घेतल्यावर विचार करावासा वाटतो की, आपल्या प्रगतशील असणारा भारत शिक्षणाच्या बाबतीत कमी का पडतोय? 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर 74.04 टक्के आहे, यामध्ये पुरुष साक्षरता 82.14 टक्के तर महिला साक्षरता दर 64.46 टक्के आहे. म्हणजेच महिलांना अधिक कमी लेखले जात आहे. एकंदरीत काय तर आजही स्त्री पुरुष समानता हे फक्त पुस्तकात वाचण्यासाठी आणि तोंडाने बोलण्यासाठीच आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नियमित समानतेसाठी लढा दिला आहे. मग तो अस्पृश्य समाजाचा विषय असो, नाहीतर महिला वर्गाचा असो. अस्पृश्यता, खालचा समाज, वरच्या दर्जाचा समाज, हा भेद मिटवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाची होळी केली होती. पण त्यामागचा खरा उद्देश बहुतेक कोणाच्या ध्यानी आलाच नाही.

मुंबईतील दादर येथील इंदू मिल परिसरात साडेबारा एकर जागेवर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारले जाणार आहे. तेथे 450 फूट उंच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जाणार आहे, आणि त्या पुतळ्याला समतेचा पुतळा किंवा स्टेचू ऑफ इक्वलिटी असे संबोधले जाणार आहे. पण खरच हा पुतळा बांधल्यावर सगळीकडे समानता प्रस्थापित होणार आहे का?

आजच्या स्पर्धेच्या युगात राजकारणामध्ये फक्त स्वतःच महत्त्व वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू आहेत. आणि माझ्यामते हे स्मारक उभारणे हा त्याचाच एक भाग आहे. कारण 11 ऑक्टोबर 2015 रोजी स्मारकाचे भूमिपूजन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले होते. आणि 2020 पर्यंत पुतळा पूर्ण होईल अशी आशा होती, पण अजून पर्यंत या पुतळ्याची एकही वीट रचली गेलेली नाही आपल्या राजकारण्याची ही एक समस्या आहे, की स्वतः कोणत्या चांगल्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आणि एखाद्याने केला तर त्यामध्ये “नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न” अशी परिस्थिती निर्माण करायची खरंतर आपल्या अधोगतीला मतभेद आणि अडथळपणा कारणीभूत आहे.

आज बाबा साहेबांच्या स्मारकावर 783 कोटी इतका खर्च केला जाणार आहे. पण खरच त्याची गरज आहे का? आज जर बाबासाहेब असते तर आधी प्रगतशील वा मग जगाला आपली प्रगती दिसू द्या! या शब्दात कान उघडणी केली असती. माझा पुतळा बांधण्यापेक्षा त्यावर होणाऱ्या खर्चात जास्तीत जास्त शिक्षनावर खर्च करा आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावा अशी विचार प्रणाली जागवली असती.

आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत क्रिया शक्तीचा समतेचा निष्कर्ष लावला तर, जगात तिसरा क्रमांक लागतो. याला कारणीभूत आपले दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची मनस्थिती आहे. काय कमी आहे आपल्या भारतात? तरी परकीय वस्तू आयात करून आपण त्यांची अर्थव्यवस्था सुरळीत करतोय. कधी बदलणार भारतीयांचे विचारसरणी? कधी होणार भारतीय स्वावलंबी? आज याच गोष्टीचा विचार करणे जास्त गरजेचे आहे. असं माझं मत आहे प्रत्येक मानवाने बाबासाहेबांचे विचार व शिकवण अंगी बाळगली पाहिजे. बाबासाहेबांचा भव्य दिव्य स्मारक उभारून देखावा करणे, गरजेचे असेल तर त्याहून अधिक प्रत्येकाच्या मनात त्यांची प्रतिमा जागी करून त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार अनुकरण करून पुढे जाणे हेच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे.

– गीता बाबर

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments