खूप काही

शिक्षक दिन विशेष; कोरोना संकटातही कर्तव्यदक्ष शिक्षक

आज 5 सप्टेंबर, भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस! पेशाने हे थोर तत्वज्ञ, प्रचंड गूढ लेखक आणि आदर्श शिक्षक. त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी अतुलनीय कार्य केले. यांचाच जन्मदिवस आपण 5 सप्टेंबर 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या देशात अनेक थोर व्यक्तींनी आपल्या ज्ञानाने सगळ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यातील एक हे सर्वपल्ली राधाकृष्णन.

आपल्या जीवनात देखील अनेक मार्गदर्शक शिक्षक असतात. आपल्याला काहीतरी नवीन ज्ञान देणारी गोष्ट शिकवणारा हा शिक्षक असतो. मग तो वयाने छोटा असो की मोठा. एक चांगलं पुस्तक ज्ञानाची नदी समजली जाते, तर एक चांगला शिक्षक अख्खा ज्ञानाचा समुद्र!

शिक्षक हा एक कलाकार असतो, जो त्याच्या कलागृहातील सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी कलेचे धडे देतो, त्यांना घडवतो. जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देत छान अस मडके तयार करतो, तसच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी घडवतात. अब्दुल कलामांच एक फार सुंदर वाक्य आहे,

“येणाऱ्या सर्व दिवसांसाठी तयारीत राहा
त्यांना सारखेच सामोरे जा.
जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सोस
अन हातोडा होशील तेव्हा घाव घाल”
या वाक्यासारखेच चोहीबाजूंनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे काम, आपले शिक्षक करत असतात.

आज कोरोनासारख्या जागतिक महामारीमध्ये आर्थिक, शैक्षणिक जीवनाची घडी विस्कळीत झाली असताना, ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक माणूस हा शिक्षक आहे. बहुदा, कर्तव्यदक्ष शिक्षक असेच मी म्हणेल. पोटाची खळगी भागविण्यासाठी काम करणारा मायबाप शेतकरी राजा, रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय मंडळी, पोलीस बांधव आणि देशाचे भविष्य घडविणारे शिक्षक हे सगळेच कर्तव्यदक्ष शिक्षक आहेत. देशाचा गाडा सुरळीत ठेवायचा असेल तर युवकांना शिक्षण देणे महत्वाचे आहे. कारण शिक्षणाने उघडतात मार्ग प्रगतीचे.

प्रगतीपथावर नेण्याचे काम आपले शिक्षक करत असतात.
कोरोना संकटातही आपले कर्तव्यदक्ष शिक्षक मंडळी ज्ञानरुपी झरा ताळेबंदीमुळे डिजिटल माद्यमातून पाझरत आहेत. आज ताळेबंदीत लोकांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते, त्यात शिक्षकांना घरात बसून अभ्यासाचे तास चालविणे म्हणजे तारेवरची कसरत.

कधी नेटवर्क चा त्रास तर कधी विद्यार्थी समोर नसल्यामुळे शिकवणीमध्ये येणारी अडचण. यातूनही मार्ग काढत आपले गुरुजन आपल्याला शिकवण्यासाठी धडपड करत असतात. काही दिवसांपूर्वी अनेक बातम्या समोर यायच्या, शिक्षकांच्या समस्यांची दखल घेतली जात नसे, पगार वेळेवर नाही तर अंगणवाडी मधील शिक्षक सेविकांना मनुष्यबळा अभावी कोरोना रुग्णांना उपचारासाठी मदतनीस म्हणून कामे पाहायला जावे लागायचे. स्वतःच्या हक्काच्या मोबदल्यासाठी त्यांना आंदोलन करावी लागतात.

खरे पहायला गेलं तर, देश सर्वदृष्या परिपूर्ण बनवायचा असेल तर शिक्षणाचा दर्जा वाढविणे गरजेचे आहे. यात जर शिक्षकांचाही दर्जा वाढवून त्यांना योग्य वेळी पगार, चांगल्या सुखसोयी, डिजिटल जगाचे धडे दिले तर त्याचा प्रत्यय हा त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच दिसेल. एका अज्ञानी मुलाला घडविणारा शिक्षक आणि दुसरे म्हणजे त्याचे आई वडील असतात. जसे बियानाचे संगोपन केले जाते तशाच प्रकारचे फळ आपल्याला मिळते. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याचे संगोपन करत असतो.

कोरोनासारख्या भयाण वास्तविक जगात आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आपण एक योद्धा म्हणून पुढे आलात. विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम आपण करता, याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत आणि वंटास मुंबई आपल्याला शतशः नमन करते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments