आपलं शहर

दिल्लीकरांकडून मुंबईत राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. याचिका दाखल करणारे हे खुद्द महाराष्ट्रातील नसून दिल्लीतील असल्याचे कालांतराने समोर आलं. विक्रम गेहलोत, गौतम शर्मा आणि वृषभ जैन अशा तिघांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल केली.

राज्यात सत्तेचा गैरवापर होत असून गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात आहे, असे मत संबंधीत याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात बेकायदेशीर कारभार सुरु असल्याचंही यामध्ये म्हटलं होतं. सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, कंगनाच्या घरावर कारवाई आणि मदन शर्मा यांना शिवसैनिकांकडून झालेली मारहाण अशा प्रकरणांवरून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

संपूर्ण महाराष्ट्रात जमत नसेल, तर फक्त मुंबईत राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी अजब मागणी या याचिकेतून करण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी ही याचिका फेटाळून लावली, इतकच नाही, तर बोबडे यांनी याचिकाकर्त्यांचा कडक शब्दात समाचार घेतला.

एका अभिनेत्याच्या आत्महत्येवरून एका राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची का, किंवा तुम्ही दिलेलं कोणतंही उदाहरण हे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी योग्य नाही, त्यामुळे तुमच्या मागणीवरून राष्ट्रपती राजवट लागू करू शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments