Mumbai Night Curfew येणारे काही दिवस धोक्याचे, म्हणून लावला नाईट कर्फ्यू

सध्या कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे, सोबतच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणुमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या कारणामुळे येणारे काही दिवस धोक्याचे आहेत आणित्यामुळे काळजी घ्यावी लागतेय, सोबतच रात्रीच्या वेळेस सोशल डिस्टन्शिंगचा फज्जा उडत होता आणि थर्डी फर्स्टला होणारी गर्दी लक्षात घेवून हा नाईट कर्फ्यू लावलाय, असं मत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडलं आहे.
रात्रीचाही कोरोना पसरतो का? असं म्हणणाऱ्यांची मला किव येते. इथूनपुढे अनेक सुट्ट्या आल्या आहेत, त्यात अनेक लोकांच्या पार्ट्या होत असतात, त्या होऊ नयेत, म्हणून हा नाईट कर्फ्यूचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर संपूर्ण जग चिंतेत आहे. राज्य सरकारनेही याच पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावले आहेत. अनेक महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे, तर अनेक ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. त्यातच भर म्हणजे इंग्लंडहून राज्यात अनेकजण परतले आहे, त्यामुळेही राज्यातल्या अनेक भागांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आतापर्यंत लंडनहून रत्नागिरीत 10, अहमदनगरमध्ये 13, कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात 55 जण आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही मोठी खबरदारी घेतली आहे.