राष्ट्रवादीने काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना फोडलं, काँग्रेस नेत्याचा कार्यकर्त्यांना सावधानतेचा इशारा
सध्या महाविकासआघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे. हे तिन्ही मुख्य पक्ष भाजपविरोधात अनेक ठिकाणी एकत्र आले आहेत.

सध्या महाविकासआघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे. हे तिन्ही मुख्य पक्ष भाजपविरोधात अनेक ठिकाणी एकत्र आले आहेत. असं असलं तरी राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले अनेक नेते, कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करत आहेत. इतकच नाही तर इतर मित्र पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीला पसंती दिली आहे.
सध्याची ताजी घटना पाहता भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही घटना साधी नसून पक्षाने यावर गंभीर विचार केला पाहिजे, असं मत काँग्रेस प्रदेश महासचिव विनायकराव देशमुख यांनी पत्राद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विनायकराव देशमुखांनी पक्षकार्यकर्त्यांना खुले पत्र लिहले आहे. पक्षप्रवेशाच्या मुद्यावरुन काँग्रेसने गंभीरपणे विचार करावा, असेही या पत्राद्वारे देशमुखांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असली तरी मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे आहे. आणि सध्याच राष्ट्रवादीने आपल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या सुचनाही दिल्या आहेत आणि आता काँग्रेस नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात आहे, ही साधी बाब नसून यावर विचार करावा, असं मत या पत्रामध्ये मांडलं आहे.
महाविकास आघाडीत मित्रपक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, हे ठरलं असतानाही राष्ट्रवादीने मित्रपक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे, त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला कसा, असा सवाल या पत्राद्वारे विचारला आहे.