आपलं शहर

पालिकेचे 1 हजार 683 कोटी रुपये थकित, वसुलीच्या आधीच यांनाही सूट मिळणार का?

गरिबांसाठी अट आणि श्रीमंतांना सुट अशी काहीशी परिस्थिती आता मुंबई महापालिकेची झालेली आहे. मुंबई महापालिकेचे करवसुलीचे काम जोर धरत असताना आता त्या कामावर गालबोट लावणारी बातमी समोर येत आहे. पालिकेचा मालमत्ता कर थकवणाऱ्या श्रीमंत थकबाकीदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शिवाय, कोट्यवधींच्या थकित कराचं काय होणार, असा सवालदेखील निर्माण होत आहे.

सर्व सामान्य नागरिकांकडून महापालिका व्याज्यासहित करवसुली करत असते, तर दुसरीकडे कोट्यवधींचा कर थकलेला असलेल्यांना झुकते माप दिले जात आहे. पालिकेला सर्वात मोठा महसूल प्राप्त करून देणारा जकात कर रद्द झाल्यामुळे पालिकेची तिजोरी वाढविण्यासाठी मालमत्ता करावर भर दिला जात आहे. मात्र आता त्याच मालमत्ता कराची चक्क 15 हजार कोटींची मोठी थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यातील 50 मोठ्या थकबाकीदारांकडे तब्बल 1 हजार 683 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये प्राधिकरण, संस्था, शासकीय तसेच निमशासकीय संस्था, विकासक आणि गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर मुंबई परिसरातील महापालिकेच्या 24 विभागांची टॉप 50 ची यादी काढली असता, त्यांच्याकडे 4450.79 कोटींची थकबाकी तर दुसरीकडे शहर विभागात 1506 कोटी, पूर्व उपनगरात 686 कोटी तर पश्चिम उपनगरात 2257 कोटी रुपयांची थकाबकी असल्याचं समोर आलं आहे.

महापालिकेचे मोठे थकबाकीदार आणि त्यांची थकलेली रक्कम

एच-पूर्व विभाग – फॉर्च्यून 2000 इमारती 164 कोटी
ए-विभागातील ईश्वसय्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर – 141 कोटी
म्हाडा मुंबई, गोरेगाव रिजन 4 – 75 कोटी
एचडीआयएल – 55 कोटी
सेव्हन हिल रुग्णालय – 51 कोटी
एमएमआरडीए – 49 कोटी
सुमेर असोसिएट्स – 37 कोटी
जवाला रियल इस्टेस्ट – 47 कोटी
रूणवाल प्रोजेक्ट्स – 29 कोटी
शिवकृपा – 35 कोटी
रघुवंशी मिल – 24 कोटी
म्हाडा – सुमारे 150 कोटी रुपये
एसआरए – 23 कोटी
हॉटेल ताज लँड एन्ड वांद्रे – 35 कोटी रुपये
बिच रिसॉर्ट – 22 कोटी रुपये
बॉम्बे क्रिकेट असोशिएशन – 34 कोटी रुपये
वरळी वल्लभभाई स्टेडियम – 28 कोटी रुपये
मुंबई विमानतळ – 25 कोटी रुपये

आता विविध कामांसाठी पालिकेकडे महसूल नसल्याची कारणे दिली जात आहेत, तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी पालिका सहन करत आहे. सामान्यांना व्याज लावून, नोटिसा पाठवून कराची थकबाकी वसूल केली जाते आणि दुसरीकडे कोटींच्या थकबाकी वसुलीचे नामोनिशान नाही.

पालिकेची अर्थ व्यवस्था रुळावर आणायची असेल तर थकबाकीची वसुली लवकरात लवकर होणे गरजेचे आहे, अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.

पालिकेचा मुख्य उत्पन्नाचा घटक हा कर असल्यामुळे मुंबई महापालिकेतील 24 वॉर्ड मधील सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. लवकरात लवकर हा महसूल गोळा करण्यात यावा, असे आदेशदेखील निधी आणि महसूल समितीकडून देण्यात आलेत, त्यामुळे येत्या काळात कोणाकडून थकित कर वसूल केले जातील, आणि कोणाचे कर माफ केले जातील, हे पाहणे गरजेचे असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments