आपलं शहर

दहावीच्या अभ्यासक्रमात 50 टक्के कपात होणार? शिक्षक संघटनांची अनोखी मागणी

कोरोनाच्या महामारीमध्ये नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद असलेल्या शाळा आणि कॉलेजेस टप्प्या टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावी बोर्डाचा अभ्यासक्रम ५० टक्के कमी करण्याची मागणी मुंबईतील मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनेने केली आहे.

डिसेंबर महिन्यापासून नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आली होती.तसेच २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.परंतु याआधी सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाला मुकलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून दहावीचा अभ्यासक्रम ५० टक्के कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.मुंबई व ठाणे या महानगरामध्ये अजूनही शाळा सुरू झाल्या नाहीत. फेब्रुवारी महिन्यात शाळा सुरू झाल्यास व अभ्यासक्रम कमी असल्यास निदान ३ महिने विद्यार्थ्यांची तयारी करून घेता येईल,यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी म्हंटले.

ऑनलाईन शिक्षण दिले जात असताना यापूर्वी दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला होता.परंतु ग्रामीण भागात असेही विद्यार्थी आहेत ज्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.अनेक पालकांना परिस्थितीमुळे आपल्या पाल्याला ऑनलाईन शिक्षणासाठी साहित्य उपलब्ध करून देता आले नाही.काही ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे शिक्षण घेता आले नाही.त्यामुळे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची तयारी करून घेता येण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ही मागणी करण्यात आली आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा मे – जून महिन्यामध्ये होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे.पण त्यापूर्वी तळागाळातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे न मिळालेल्या शिक्षणाबद्दल शिक्षण विभागाने काही विचार केला आहे का?असा सवाल मुंबई मुख्याध्यापक संघटनेसह राज्यातील इतर शिक्षक संघटना व ग्रामीण भागातील शिक्षकांनी केला आहे.शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांकडून अपेक्षित तयारी करून घेता यावी,यासाठी त्यांचा अभ्यासक्रम कमी करावा असं शिक्षकांचं म्हणणं आहे.सगळ्याचा विचार करून ५० टक्के अभ्यासक्रम कमी करा किंवा ५० टक्के गुण हे अंतर्गत मूल्यमापन करून देण्याचा विचार करा,अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषद संघटनेच्यावतीने शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments