खूप काही

ठाण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चित्रनगरी व्हावी, अभिनेता सुशांत शेलारचे एकनाथ शिंदेना निवेदन

ठाणे जिल्हा हा अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमासृष्टीतील कलाकारांचे माहेरघर मानला जातो. ठाण्यात अनेक मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. प्रत्येक कलाकाराच्या मनात ठाणे शहराबद्दल आपलेपणाची भावना आहे. परंतु अनेक कलाकारांना व तंत्रज्ञ व्यक्तींना तांत्रिक गोष्टींसाठी बहुतांशी मुंबई शहरावर अवलंबून राहावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन मराठी चित्रपट अभिनेता सुशांत शेलार याने ठाणे शहराचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन दिले आहे.

ठाणे शहरातील कलाकारांच्या सोयीसाठी व शहराच्या विकासासाठी ठाणे येथे मुंबई चित्रनगरीच्या तोडीची सर्व सोयीसुविधा असलेली तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी चित्रनगरी उभी करावी, असे निवेदन सुशांत शेलार याने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. हे निवेदन त्याने सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांच्या वतीने दिले आहे. विशेष बाब म्हणजे, या चित्रपटनगरीला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे असे नामकरण करावे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ठाण्यामध्ये वास्तव्यास असलेल्या तमाम मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार व तंत्रज्ञ यांना सोयीचे व्हावे, तसेच त्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून हे निवेदन देण्यात आल्याचे त्याने सांगितले. बाळासाहेब ठाकरे हे स्वतः कलाकार असल्याने नेहमीच ते कलाकारांच्या पाठीशी कणखरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी कायम कलाकारांचा सन्मान केला.मराठी कलाकारांना तर त्यांनी नेहमी मदतीचा हात दिला. या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना एक अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, असे सुशांत शेलार याने सांगितले.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ठाण्याचे नाव जगाच्या नकाशावर अधिक ठळकपणे कलात्मकदृष्ट्या उमटवण्यासाठी या प्रस्तावाचा विचार करावा, अशी विनंती त्याने एकनाथ शिंदे यांना केली आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments