फेमस

एकमेव, अद्वितीय आणि रोखठोक बाळ केशव ठाकरे; नव्या इतिहासाची सुरुवात

असंख्य लोकांचे कैवारी आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे “साहेब” अर्थात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) 95वी जयंती आहे. 23 जानेवारी रोजी प्रत्येक शिवसैनिकाला बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणुकीची आठवण होते, उजळणी होते.

व्यंगचित्रकार बाळ ठाकरे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा त्यांचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. “दी फ्री प्रेस जर्नल” मधील नोकरी सोडून स्वतःचं आणि मुळात एका मराठी माणसाचं, मराठी माणसासाठी काहीतरी असावं हा विचार करून 1960 साली “मार्मिक” या मराठीतील पहिल्या व्यंगचित्र साप्ताहिकाची त्यांनी सुरुवात केली.

बाळासाहेबांनी वेळोवेळी मार्मिक मधून मराठी माणसाचा आवाज इतरांपर्यंत पोहोचवला. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी कायम आपली भूमिका घेतली. मार्मिक मधील “वाचा आणि थंड बसा” हे सदर तर त्यावेळी खूपच गाजले.

मुळात मार्मिक यशस्वी झाले ते त्यातील सदरांमुळे आणि प्रामुख्याने व्यंगचित्रांमुळे. मार्मिक मधील बाळासाहेबांचे “फटकारे”, स्व. श्रीकांत ठाकरे यांचे “सिने प्रिक्षान” हे सिनेमा विषयक सदर, इत्यादी.

मार्मिक जसजसं प्रसिद्ध होत गेलं तसं त्याचा व्यापही वाढू लागला. आपल्यावर अन्याय झालेली लोकं मातोश्रीवर जाऊन आपली व्यथा मांडायचे. त्यातूनच मग “शिवसेना” या संघटनेचा जन्म झाला. विशेष म्हणजे शिवसेना स्थापन झाल्याची बातमीही मार्मिक या एकमेव साप्ताहिक अथवा वृत्तपत्राने दिली होती, असं त्यावेळची मंडळी सांगतात.

शिवसेना एक राजकीय पक्ष म्हणून जसजसा विस्तारू लागला, वाढू लागला, तशी तरुण पिढी त्यांच्याकडे आकृष्ट होऊ लागली. राजकीय सभांमध्ये बाळासाहेबांची भाषणं अधिक जहाल होत गेली. ते त्यांच्या भाषणात विरोधकांची सालं काढायचे, विरोधकांना पार ठोकून काढायचे.

मात्र हे असं जरी असलं तरी, बाळासाहेब एक मित्र म्हणून मोठ्या मनाचे दिलदार, प्रेमळ मित्र होते. राजकारणात एकमेकांवर प्रहार करणं क्रमप्राप्त होतं. पण एकदा का मित्र म्हणून ती व्यक्ती समोर आली, की मग ते राजकीय विरोधक राहत नसत. दिवसभर एकमेकांवर प्रहार आणि संध्याकाळी मात्र हे मित्र एकत्र यायचे.

बाळासाहेबांनी दिलेलं बाळकडू

“मला देवळातील घंटा बडवणारा हिंदू नको. जो हिंदु हिताकडे वाकड्या नजरेने पाहिलं, त्याला तिथल्या तिथे बडवणारा हिंदु मला हवाय.”

“व्यंगचित्र केवळ तुम्हाला समजून चालणार नाही, तुम्ही ज्यांच्यासाठी काढता आहात त्यांना ते समजले पाहिजे. तुम्हीच तुमच्या कलेवर खुश असता कामा नये. दुसरे तुमच्यावर खुश असले पाहिजेत.”

“स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्या खंडू खोपड्यांसारख्या फितुरांना छत्रपतींनी कधीही माफ केलं नाही. त्याचप्रमाणे आज शिवशाहीशी गद्दारी करणाऱ्या फितूरांना खड्यासारखे दूर ठेवा.”

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी मानाचा मुजरा, विनम्र अभिवादन..

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments