एकदम जुनं

बॉम्बे टू मुंबई : पोर्तूगीज, इंग्रज ते शिवसेनेने दिलेल्या नावाचा वंटास प्रवास

पोर्तूगीज भाषेतील मुंबई, बॉम्बे म्हणजेच मुंबई हे शहर आता भारताची आर्थिक, व्यावसायिक राजधानी आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे. पोर्तूगीज जेव्हा मुंबईत आले तेव्हा इथे सात बेटांचा द्वीपसमूह होता. ई. पूर्व तिसरे शतक ते 1348 दरम्यान ही बेटे एकापाठोपाठ हिंदू राजघराण्यांच्या ताब्यात आली. ठाणे, वसई येथे काही दशके राज्य करत असलेल्या गुजरातमधील मुस्लिम राज्यकर्त्यांनी 1391 ते 1534 या काळात ही बेटे ताब्यात घेतली.

त्याच काळात मुघल बादशाह हुमायूनची भीती नागरिकांमध्ये वाढत चालली होती. त्यामुळे गुजरात सल्तनतच्या बहादूर शहाने 23 डिसेंबर 1534 रोजी पोर्तूगीज साम्राज्यासह बासेन करारावर सही केली. या करारानुसार मुंबईची सात बेटे, जवळपासचे बासेन शहर आणि त्यावरील हक्क पोर्तूगीजांना देण्यात आले. नंतर 25 ऑक्टोबर 1535 रोजी हे प्रांत पोर्तूगीजांच्या स्वाधीन केले गेले.

पोर्तूगीजांनी मुंबईला बॉम्बे असे नामकरण केले. ज्याचा पोर्तूगीज मधील अर्थ उत्तम किनारा असा होतो. पोर्तूगीजांनी बॉम्बेमध्ये त्यांच्या रोमन कॅथोलिक धर्माचा पाया रोवण्यावर आणि प्रसार करण्यावर जास्त भर दिला. त्यांनी बेटांना वेगवेगळ्या नावांनी संबोधित केले, ज्यांचे शेवटी बोंबैम असे नामकरण करण्यात आले. वेगवेगळी बेटे वेगवेगळ्या पोर्तूगीज अधिकाऱ्यांना देण्यात आली.

पोर्तुगीज फ्रान्सिस्कन्स आणि जेसुइट्सने शहरात अनेक चर्च बांधली, मुख्यत: माहीम येथील सेंट मायकेल चर्च, अंधेरी येथील सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च, वांद्रे येथील सेंट अ‍ॅन्ड्र्यू चर्च आणि भायखळा येथे ग्लोरिया चर्च.

पोर्तुगीजांनी बॉम्बे कॅसल, वांद्रे किल्ला आणि मड किल्ला असे शहराभोवती किल्ले बांधले. ब्रिटिशांनी बॉम्बेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सतत संघर्ष केला होता, कारण त्यांनी मोक्याचे नैसर्गिक बंदर आणि जमीन-हल्ल्यांपासून त्याचे वेगळेपण ओळखले.

17 व्या शतकाच्या मध्यापर्यंत डच साम्राज्याच्या वाढत्या सामर्थ्याने ब्रिटीशांना पश्चिम भारतातील काही भाग मिळाला. 21 मे 1662 रोजी, इंग्लंडचा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालचा राजा जॉन चौथा याची मुलगी कॅथरीन यांच्या विवाह निमित्ताने हुंडाचा भाग म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली. तसा लेखी करार करण्यात आला. या करारानंतरही मुंबईतील काही गावे पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली, परंतू नंतर बरीचशी इंग्रजांनी ताब्यात घेतली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईत 1995 साली महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली. त्यावेळेस मराठी माणसाची अस्मिता जपण्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भर होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून अस्तित्वात आली आणि 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईची ग्रामदेवता असलेल्या ‘मुंबादेवी’च्या नावावरून बॉम्बेचे नामकरण मुंबई असे केले. अस असलं तरी आजतागायत हिंदी भाषिकांमध्ये मुंबई ही ‘बॉम्बे’ म्हणून ओळखली जाते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments