खूप काही

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, उद्धव ठाकरे गर्जले

मराठी माणूस एकत्र येऊन काम करत नाही, एकत्रितपणे शत्रूशी लढत नाही, तो पर्यंत सीमावादाचा प्रश्न सुटणार नाही. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाची लढाई आपण जिंकू शकत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सांगितलं. त्याचप्रमाणे, कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीये. या सरकारने कर्नाटक सीमावाद सोडवला नाही तर हा प्रश्न कोणीही सोडवू शकणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

आज (२७ जानेवारी) डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लिहिलेल्या संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या सोहळ्याला शरद पवारांची देखील उपस्थिती होती. यावेळी त्यांनी ही मागणी केली. कोर्टात एखादं प्रकरण असेल तर त्यानुषंगाने कोणतेही निर्णय घ्यायचे नसतात,असं त्यांनी कर्नाटक सरकारला बजावलं आहे.

“कारण तो कोर्टाचा अवमान समजला जातो. पण कर्नाटक व्याप्त भूभागाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारने बेळगावचं नामांतर केलं. बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधिमंडळाचे अधिवेशनही घेतले. कर्नाटकची ही मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता हा वादग्रस्त भागच केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे. कोर्टात ही मागणी करायला हवी”, असं मुख्यमंत्री भर सभेत म्हणाले.

“संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील महाराष्ट्र एकीकरण समिती फुटली कशी? मराठी माणलासा दुहीचा शाप आहे. एकीकरण समिती ही मराठी माणसाच्या एकीची ताकद होती. आपण आपल्या मायबोलीची ताकद उधळून लावली. कशासाठी? तर राजकीय स्वार्थासाठी. या एकीकरण समितीत अपशकून नको म्हणून आम्ही कधी त्यात शिवसेना आणली नाही. मार्मिकही आणलं नाही”,असं सांगत पुन्हा एकदा ही समिती निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे असेदेखील ते म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments