आपलं शहर

बेस्टसाठी बस, ड्राईव्हर पाठोपाठ आता कंडक्टरही खाजगी

संपूर्ण मुंबईभर धावणारी आणि रेल्वे पाठोपाठ मुंबईकरांसाठी अहोरात्र सेवा देणारी बेस्ट बस काही वर्षांपासून तोटयात असल्याचे चित्र आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर उपाय केले जात आहेत. अशातच आणखी एक पर्याय म्हणून बेस्टने खाजगी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावानुसार ड्राइव्हर आणि कंडक्टर देखील कंत्राटी असणार आहे.

बेस्ट ही भारतातील सगळ्यात मोठ्या परिवहन सेवेपैकी एक मानली जाते. बेस्ट म्हणजेच बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम हा मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीत येतो. बेस्टसंबंधी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुंबई महानगर पालिकेचे आहेत. आणि आताही खासगीकरणाला विरोध असतानादेखील या प्रस्तावाला बेस्ट समितीची मान्यता मिळाली आहे.

या प्रस्तावानुसार बेस्ट ४०० बसेस कंत्राटदाराकडून घेणार आहे. तर त्यावरील चालक व कंडक्टरसुद्धा कंत्राटी पद्धतीचाच असणार आहे.बेस्टने सीएनजी वर चालणाऱ्या ४०० बस १० वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. १,९४२ कोटी रुपये खर्चून या बस बेस्ट मध्ये घेण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीत मान्यता देण्यात आली. याआधी भाडेतत्वार घेतलेल्या बसेस साठी फक्त चालक कंत्राटी पद्धतीने घेतले जात होते. परंतु नवीन प्रस्तावानुसार बस चालकापाठोपाठ कंडक्टरही कंत्राटी पद्धतीनेच घेतले जाणार आहेत.

विरोधानंतरही प्रस्तावाला मान्यता-

बेस्ट समितीच्या बैठकीत भाजपकडून या प्रस्तावाला विरोध केला गेला. अशा प्रकारे कंत्राटीकरण होत गेले तर बेस्टचे अधिकार धोक्यात येतील, असे भाजप सदस्यांचे म्हणणे होते. बेस्टसाठी बसेस, चालक यांबरोबर आता कंडक्टर ही कंत्राटी घेतल्यात बेस्टचे भविष्य काय, असा सवाल बेस्ट समितीतील भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केला.

आमचा बेस्टच्या खाजगीकरणाला विरोध कायम आहे. फक्त बेस्टला बसेस लवकरात लवकर मिळाव्या आणि प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी म्हणून आम्ही हा प्रस्ताव मंजूर करण्यास सत्ताधारी पक्षाला मदत केली असल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments