आपलं शहरफेमस

पोरांनो, कॉलेज सुरू होतंय, तेही जानेवारीच्या ‘या’ तारखेला!

कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये अर्ध क्षमतेत म्हणजे 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्या बाबत सरकारचा विचार आहे, असे महत्वाचे वक्तव्य शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. यावर येत्या 20 जानेवारी पर्यंत महाविद्यालय सुरू करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापक यांच्याशी आज (9 जानेवारी) फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधत असताना ही माहिती त्यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा फैलाव कमी होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुरक्षित अंतर पाळणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कोरोनाचा फैलाव हा विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे, कोरोनाचे प्रमाण देखील कमी होत आहे. यातच भर म्हणून येत्या काही दिवसात लसीकरणालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा विचार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे केला जात असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

पुढील 8 ते 10 दिवसांत याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून, वसतिगृह, कॉलेज याबाबत मुख्य निर्णय घेण्यात येईल. येत्या 20 जानेवारी पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील महाविद्यालय सुरू केली जावीत का? यासाठी काही नियमावली तयार करता येईल का? याचा विचार सुरू आहे.

– उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

महाविद्यालयाच्या प्रश्नाबरोबर महाविद्यालये सुरू करण्याआधी विविध विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. तसेच महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे, प्राध्यापक भरती यांसह इतर विषयांवर उदय सामंत यांनी चर्चा केली. शिवाय विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे व सहाय्यक प्राध्यापक पदे ही प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणे भरण्याचा निर्णय लवकरचं घेतला जाईल असेही उदय सामंत म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments