खूप काही

जन्म घ्यावा पुन्हा मी, भारतमातेच्या पोटी, भारत मातेसाठी

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताॅं हमारा हमारा,
सारे जहाँ से अच्छा,
हम बुलबुलें है इसकी
यह गुलसिता हमारा हमारा!

२६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण दिवस! या सुवर्णदिनी आपण आपले भारतीय संविधान स्वतःप्रत अर्पण केले होते. त्या क्षणांनातर बरोबर २ महिन्यानंतर अर्थातच २६ जानेवारी, १९५० रोजी आपले संविधान अंमलात आणण्यात आले. या सुवर्ण क्षणाला आज जवळपास ७१ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे.
२६ जानेवारी म्हटलं की नेहमीपेक्षा अधिक उत्साह, आणि का नसावा? आपला राष्ट्रीय सण आहे तो! १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या केलेल्या पराभवाचा एक पुरावा!

प्रजासत्ताक दिन म्हटलं की लहानपणीच्या आठवणी नसतील, हे अशक्यच! जवळपास १५ ते २० दिवसांआधीच राष्ट्रगीताचा आणि ध्वजगीताचा रियाज. शाळेच्या आवारात जाण्याआधीच रस्त्यात लाऊडस्पिकरवरून ऐकू येणाऱ्या देशभक्तीपर गीतांमुळे अंगी १० हत्तींचं बळ यायचं. त्यात लतादीदींचं ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गीत ऐकल्यावर तर डोळ्यांत आसव आल्याशिवाय राहायची नाहीत.

सैन्याची जशी मोठी तुकडी असावी अगदी तशाच प्रकारे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी हे पूर्ण गणवेशात मैदानावर वेळेच्या आधी तैनात असायचे. ‘राष्ट्रध्वजाला सलामी द्या’ असे म्हणताना ज्या अभिमानाने ऊर भरून येतो, तो प्रसंग कदाचित अपवादच मानावा! राष्ट्रगीत गाताना डोळ्यांना कितीही ऊन लागत असलं तरी मनातला अभिमान त्यासमोर फिका पडायचा.

‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ या ध्वजगीताने आपण देशासाठी काहीतरी नक्कीच करू शकतो अशी जिद्द मनात जागृत व्हायची. शिक्षकांचे मार्गदर्शन तर देशप्रेमाची शाल हलकेच अंगावर पांघरून ऊब देऊन जायचे. काही विद्यार्थ्यांनी तयार केलेले भाषण म्हणजे आपल्यातीलच कोणीतरी नेतृत्व करू पाहतोय, हा आनंद देणारा क्षण. या आठवणी आज मनाला पुन्हा बालपणात घेऊन जातात.

काळाच्या ओघात हे सर्वच आता लुप्त होताना दिसतंय, आजकाल २६ जानेवारी हा राष्ट्रीय सण म्हणून कमी व सुट्टीचा दिवस म्हणून जास्त बघितला जातोय. म्हणजे उत्सुकतेने सकाळी लवकर उठून आपापल्या शाळेत, महाविद्यालयात, कार्यालयात ध्वजवंदन करण्यासाठी जाणं म्हणजे झोप मोड करणं असंही कित्येक जणांना वाटतं.

देशभक्ती म्हणजे केवळ सीमेवर जाऊन लढण नव्हे, तर आपण जिथे कुठे राहत असू, तेथून देशाच्या भवितव्याचा विचार करणे म्हणजे देशभक्ती. मग ती देशातील स्वच्छ्ता असो किंवा बांधिलकी! २६ जानेवारीला आणि १५ ऑगस्टला मोठ्या रुबाबात कपड्यांवर राष्ट्रध्वज मिरवणारे लोक जेव्हा तोच राष्ट्रध्वज २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला रस्त्यावर पडलेले दिसतात, तेव्हा ते उचलण्याची दखल फार कमी जण घेतात. तीच खरी देशसेवा आणि देशभक्ती! बाकीची उदाहरण कशाला द्यायची ओ, आताचं ताजं उदाहरण म्हणजे हा कोरोना, या काळात तर आपल्या देशात असंख्य मृत्यू झाले. पण डॉक्टर, सफाई कर्मचारी, सामाजिक संस्था आणि अगदी लहानातल्या लहान पातळीवर काम करणाऱ्या लोकांनी जे कार्य केले ती म्हणजे देशसेवा! सीमेवर जाऊन नाही तर सीमेच्या आतच असंख्य संकटांशी लढून देशाला जपणे, म्हणजे खरी देशसेवा!

मज नकोत कोणत्या सीमा देशभक्तीसाठी,
ना मनी कोणती भीती,
स्वार्थ एकच कायम असावा माझ्या या ओठी,
जन्म घ्यावा पुन्हा मी भारतमातेपोटी, भारतमातेसाठी!

-दिशा अनिता बापू सरमळकर

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments