खूप काही

IND vs ENG : भारत, इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये प्रेक्षकांना ‘नो एण्ट्री’

ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक विजयानंतर आता वेळ इंग्लंडची आहे. सुमारे एका वर्षाच्या काळावधीनंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय भूमीवर क्रिकेट स्पर्धा किंवा मालिका खेळली जाईल.

4 कसोटी मालिकेसाठी भारत आणि इंग्लंड आमनेसामने असतील. यातील पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथे खेळले जातील. पण, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी देण्यात आली आहे. ताज्या बातमीनुसार चेन्नई येथे होणाऱ्या मालिकेतील दोन्ही कसोटी सामने रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील.

तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने आपल्या सर्व सदस्यांना सांगितले आहे की कसोटी सामन्यादरम्यान प्रेक्षकांना प्रवेशबंदी असेल. भारत सरकारने याआधीच सर्व मैदानी खेळांमध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाईल. तर दुसरी कसोटी 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

TNCA जोखीम घेण्यास तयार नाही

20 जानेवारी रोजी TNCAचे सचिव आर. रामास्वामी यांनी आपल्या संघटनेच्या सर्व सदस्यांना सांगितले की बीसीसीआयच्या सुरक्षेच्या बाबी लक्षात घेता आपण कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्याचे टाळले पाहिजे. आम्ही मालिकेदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेसोबत खेळू शकत नाही. अशा स्थितीत बोर्डाच्या सूचनेनुसार रिकाम्या स्टेडियममध्ये पहिल्या दोन कसोटी खेळविण्यात येतील.

या निर्णयामुळे केवळ प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी येणार नाही, तर त्यांच्या व्यतिरिक्त अतिथी आणि उपसमितीचे सदस्य सामना पाहण्यास येऊ शकणार नाहीत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेच्या शेवटचे दोन कसोटी सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. तिसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान पिंक बॉलवर खेळला जाईल. मालिकेचा शेवटचा कसोटी सामना येथे 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान असेल.

गुजरात क्रिकेट असोसिएशन मात्र आपल्या मोटेरा स्टेडियमचा काही भाग प्रेक्षकांसाठी उघडणार आहे. गुजरात क्रिकेटच्या एका वरिष्ठ अधिकार्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार 20 ते 30 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याची त्यांची योजना आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments