खूप काही

Jumbo Vaccination Centre : देशातील सगळ्यात मोठे लसीकरण केंद्र उभारलं मुंबईत…

संपूर्ण राज्यभर कोरोना लसीची रंगीत तालीम (Dry Run) केली जात आहे. या रंगीत तालीममध्ये रुग्णांना हाताळणे, त्यांचे रजिस्ट्रेशन करुन घेणे, त्यांना लस देणे, लस दिल्यानंतर रुग्णांवर नियंत्रण ठेवणे अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे. (Jumbo Vaccination Center: The largest vaccination center in the country has been set up in Mumbai)

याच प्रकारचे प्रशिक्षण मुंबईतल्या बीकेसीमध्ये उभारलेल्या जम्बो कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दिलं जाणार आहे. देशातील सर्वात मोठं कोव्हिड हॉस्पिटल म्हणून बिकेसीतील मोकळ्या मैदानात उभारलेल्या कोव्हिड सेंटरची ओळख आहे. तीच ओळख आता जम्बो लसीकरण केंद्र म्हणून तयार होत आहे.

बीकेसीतल्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दिवसाला तब्बल 2400 रुग्णांना लस दिली जाणार आहे. सर्वात आधी वैद्यकीय, स्वच्छता, सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने आधीच कोरोना योद्ध्यांची माहिती जमा केली आहे. त्यानुसार कुठल्या दिवशी कोणाला लस दिली जाणार आहे, याप्रकारची माहिती कोव्हिड योद्ध्यांना मॅसेज अथवा कॉलद्वारे कळवले जाणार आहे.

कसं असेल लसीकरण केंद्रातलं काम

केंद्रात प्रवेश करताना आधी स्वयंसेवकांचे किंवा लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचे तापमान तपासलं जाईल. सुरुवातीला आलेल्या रुग्णांना वेटिंग रुममध्ये बसवलं जाईल. रुग्ण आल्यानंतर त्यांना टोकन दिली जाईल आणि टोकनप्रमाणे रजिस्ट्रेशन केलं जाईल. नाव, पत्ता आणि लसीकरणाच्या माहितीसाठी तयार केलेल्या अॅपमध्ये संबंधित स्वयंसेवकांची माहिती भरलेली आहे की नाही, याची तपासणी केली जाईल.

रजीस्ट्रेशन झाल्यानंतर लस देण्यासाठी वॅक्सिनेशन रुममध्ये नेलं जाईल. तिथे रुग्णांना विश्वासात घेऊन लस दिली जाणार आहे. वॅस्किन दिल्यानंतर रुग्णांवर कोणते परिणाम होतात का हे पाहण्यासाठी ऑब्जर्वेशन रुम तयार करण्यात आली आहे. लस दिल्यांनंतर काही काळ रुग्णांना अथवा स्वयंसेवकांना या रुममध्ये बसवलं जाईल, तिथे लस दिलेल्यांच्या शरिराच्या तापमानासह इतर हालचालींवर लक्ष ठेवले जाईल.

ऑब्जर्वेशन रुममध्ये काही व्हिडीओ क्लिप्स चालवल्या जातील, जेणेकरुन लस दिल्यानंतर रुग्णांना काय काळजी घ्यायची आहे, हे दाखवलं जाईल. याप्रकारे टप्प्याटप्प्याने लाखो मुंबईकरांना लस दिली जाणार आहे. त्याच्या रंगित तालिमी सुरु झाल्या आहेत, केंद्र सरकारच्या परवानगीनंतर लस येताच लसीकरणासाठी सुरुवात केली जाईल. त्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील वैद्यकिय सेवा सज्ज आहे, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments