आपलं शहर

मुंबईत हाय प्रोफाइल कास्टिंग काऊच रॅकेट उघडकीस

मुंबईमधील एक मोठं कास्टिंग काऊच रॅकेट उघडकीस आणण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेला यश आलं आहे.बुधवारी २० जानेवारी रोजी जुहू येथील पंचतारांकित हॉटेल वर छापा टाकत पोलिसांनी धडक कारवाई केली व रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. क्राईम इंटलिजन्स ब्युरो (सीआययू) चे एपीआय सचिन वझे यांना प्रेम नावाच्या व्यक्तीबद्दल टीप मिळाल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले.

प्रेम उर्फ संदीप इंगळे हा बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक व निर्माता म्हणून काम करत होता. गेली पाच वर्ष तो हे रॅकेट चालवत असल्याचे कळाले आहे. महत्त्वाकांक्षी अभिनेत्री आणि मॉडेल्सना चांगल्या भूमिका देण्याचे आमिष दाखवून तो त्यांना वेश्याव्ययवसायात पडण्यास भाग पाडत होता.

जाहिराती, चित्रपटांमध्ये काम करणार्‍या मॉडेल्स होत्या टारगेट

आरोपींनी जाहिराती, वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम करणार्‍या महिलांना लक्ष्य केले. या रॅकेटची माहिती समजल्यानंतर गुन्हे शाखेने आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. या सापळ्याचा एक भाग म्हणून प्रेमने दिलेल्या बँक खात्यात आमिष म्हणून २ लाख रुपये जमा केले गेले. १९ जानेवारी रोजी सीआययू आणि सोशल सर्व्हिसेस (एसएस) यांनी एकत्र येऊन प्रेमला पकडण्यासाठी सापळा रचला.

8 जणींवर केली जबरदस्ती

प्रेम आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या दोन महिलांनी इतर 8 महिलांना या कामासाठी प्रवृत्त केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून सर्व महिलांची सुटका करण्यात आली.

प्रेम आणि त्याच्या दोन महिला साथीदारांवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलमांसह अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्याच्या (पीआयटीए) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ जानेवारीपर्यंत आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. आरोपींकडून १५ फोन व डस्टर कारसह ५.५ लाख रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments