आपलं शहर

कोरोना लसीसाठी मुंबईचा मास्टर प्लॅन तयार, ‘या’ ठिकाणी असेल स्टोरेज

सध्या देशात कोरोनापेक्षा त्याच्या लसीवर सर्वाधिक चर्चा होत आहे. 2 जानेवारीपासून देशभरात ड्राय रनची प्रक्रियादेखील सुरु झाली आहे, त्यामुळे देशासह राज्यात कोरोनाच्या लसीसाठी जय्यत तयारी केली जात आहे. अशाचप्रकारची तयारी महाराष्ट्रातदेखील केली जात आहे. मुंबईसह पुणे, जालना, नागपूर, नंदुरबार या ठिकाणी कोरोना लसीचे स्टोरेज केलं जाणार आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या एकूण 5 ठिकाणी व्हॅक्सिनचे स्टोरेज केले जाणार आहे. (Mumbai’s master plan for corona vaccine is ready, storage will be at this place)

मुंबई महानगरमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश कांकाणी यांनी नुकतीच एक माहिती दिली आहे, ज्यामध्ये मुंबईतील कोरोना लसीच्या स्टोरेजच्या परिस्थितीबाबत सांगण्यात आलं आहे.

लस साठवून ठेवण्यासाठी मुंबईमधील एकूण 4 प्रमुख रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सायन, केईएम, नायर आणि कूपर रुग्णालयांचा समावेश आहे. कोरोना लस ठेवण्यासाठी या रुग्णालयांमध्ये तयारी करण्यात आली आहे. याचबरोबर कांजूरमार्गमधल्या आरोग्य विभागाच्या इमारतीत 5 हजार स्केवअर फूट जागा राखीव ठेवण्यात आली आहे, त्यामुळे मुंबईतील एकूण 5 ठिकाणी कोरोना लसीचे स्टोरेज होणार असल्याची माहिती सुरेश कांकाणी यांनी दिली आहे.

कशी आहे लसीच्या स्टोअरेज तयारी
मुंबईतल्या सायन, केईएम, नायर आणि कूपर या 4 रुग्णालयांमध्ये तब्बल 10 लाख लसींचे स्टोअरेज करता येईल अशी सुविधा करण्यात आली आहे. तर कांजूरमार्गमधील आरोग्य विभागाच्या इमारतीत 50 लाख लसींची साठवणूक करता येईल, इतकी क्षमता आहे. ज्या ठिकाणी लस ठेवण्यात येणार आहे त्या विभागात -25 ते -15 (उणे 25 ते उणे 15) डिग्री तापमानाची सुविधा करण्यात आली आहे.

पहिला लस कोणाला?
लस उपलब्ध झाल्यानंतर 24 तासात पहिल्या टप्प्यातील नागरिकांना लस दिली जाईल. त्यासाठी मुंबईत एकूण 50 सेंटरची निवड करण्यात आली आहे. ही सगळी सेंटर 2 शिफ्टमध्ये काम करेल, त्यामुळे मुंबईतील लाखो नागरिकांना टप्प्याटप्प्याने लवकरात लवकर लस देण्याच नियोजन सुरु आहे.

आधी लस कोणाला मिळणार?
शासकीय कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार अशा कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाईल, त्याचबरोबर खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल, अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती पालिकेने आपल्याकडे जमा केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments