फेमस

”म्हणून मी माझ्या मुलाचं नाव अजिंक्य ठेवलं”, अजिंक्य रहाणेच्या वडिलांनी सांगितलं कारण

अजिंक्य रहाणे आणि त्याच्या नवख्या टीमने ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टेस्ट क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला. सर्व भारतीयांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सर्वांचे त्यांच्या मायदेशी जंगी स्वागतही करण्यात आले. क्रिकेट मैदानावर शांत व संयमाने वागणारा अजिंक्य आणि लोकप्रिय अभिनेता अजिंक्य देव यांचा एकमेकांशी एक वेगळाच संबंध आहे, हे तुम्हाला माहित आहे का?

एका मराठी दैनिकाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य रहाणे याच्या वडिलांनी याबाबतीत खुलासा केला आहे. अजिंक्यच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपल्या मुलाचं नाव त्यांच्या आवडत्या अभिनेत्याच्या नावावर ठेवलं होतं. तो अभिनेता म्हणजे ९० च्या दशकातील तरुणाचा आवडता अजिंक्य देव. खुद्द अजिंक्य देवला ही गोष्ट समजताच ते सुद्धा हे वाचून भावुक झाले.

सोशल मीडियावर अजिंक्य देव लिहितात, ”मी अजिंक्यच्या वडिलांची एक मुलाखत वाचली ज्यात त्यांना त्यांच्या मुलाचं नाव अजिंक्य का ठेवलं असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘माहेरची साडी’ या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका करणाऱ्या अभिनेत्याच्या नावावर मुलाचं नाव ठेवल्याचे सांगितले. ही माझ्यासाठी खूप मोठी व अभिमानाची गोष्ट आहे. अजिंक्य नेहमी अजिंक्यच राहावा यासाठी मी प्रार्थना करेन.” आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अजिंक्य देव म्हणाले,”मला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या व्यक्तीने भारतासाठी एवढी मोठी कामगिरी केली त्या व्यक्तीशी माझं असं गोड नातं आहे.” अजिंक्य देव यांचं नाव सुद्धा त्यांच्या आजोबांवरून ठेवण्यात आलं होतं . ”माझे आजोबा हे छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारी वकील होते व ते एकही केस हरले नाहीत. त्यामुळे माझ्या वडिलांनी माझं नाव अजिंक्य असं ठेवलं, ज्याचा अर्थ एक व्यक्ती जी कधीही पराभूत होत नाही असा होतो. त्याशिवाय अजिंक्य हे बऱ्याच लोकांचं आडनाव देखील आहे” असेही ते म्हणाले.

जेष्ठ अभिनेते रमेश देव व सीमा देव यांचे सुपुत्र असलेले अजिंक्य देव हे लवकरच ‘झोलझाल’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करीत आहेत. त्यात ते एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments