कारण

मुंबई दोन भागात विभागणार? डबल आयुक्तांच्या मागणीचा वाद चिघळला

राज्यात ग्रामपंचायतीचे बिगुल वाजल्यानंतर अनेक महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी गाजताना पाहायला मिळत आहे. अध्याप लांबणीवर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची चुरसही रंगू लागली आहे. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचे चित्र असताना मुंबई पालिकेत हेच चित्र काहीसं वेगळं असल्याचं जाणवू लागलं आहे. (The controversy started even before the Mumbai Municipal Corporation election)

गेले कित्येक वर्षे मुंबई पालिकेची सत्ता शिवसेनेच्या हातात आहे, मात्र इथून पुढे पालिकेवर शिवसेना भगवा फडकवणार का, असा सवाल केला जात आहे. याला कारण ठरलं आहे, ते म्हणजे शिवसेनेतून वेगळा झालेला भाजप पक्ष. विधानसभेपासून शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर भाजपने अनेकदा, अनेक ठिकाणी शिवसेनेला कोंडीत पकडायचे काम केले आहे, त्याची धुरा भाजप नेते किरीट सोमय्या, राम कदम, आशिष शेलार यांच्याकडे सोपवल्याचं स्पष्ट दिसतंय.

आता या सगळ्यात राज्यातील सत्तेत शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेसचेही मत काहीसे वेगळे होत असल्याचं पाहायला मिळतंय. याचं कारण ठरत आहेत ते म्हणजे मुंबईचे पालक मंत्री, काँग्रेस नेते अस्लम शेख त्याचबरोबर मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते रवी राजा यांनी मांडलेली अनेक मते.

सध्याच काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी मुंबई मनपामध्ये 2 आयुक्तांची नेमणूक करावी, असा ठराव मांडलाय, ही मागणी मुंबईचे क्षेत्रफळ, वाढत चाललेली लोकसंख्या, अशा अनेक गोष्टींच्या अनुषंगाने केली आहे. मुंबई आणि उपनगर अशा दोन भागांना दोन पालिका आयुक्त असावेत, असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे. मात्र याच वक्तव्याला काँग्रेस नेत्यांनीच विरोध केला आहे.

काँग्रेस नेते रवी राजा यांनी या वक्तव्याचं खंडन केलं आहे. त्यांच्यामते अस्लम शेख यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याचा आणि काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी काहीही संबंध नाही. मुंबई पालिकेसह उपनगराचा कारभार पाहण्यासाठी एकच पालिका आयुक्त असावेत, अस रवी राजांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या मुंबई पालिका निवडणुकीत काँग्रेसचा नेमका विचार काय, हे सध्या कळू शकत नाही.

हा वाद एकीकडे सुरू असताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी येत्या एका वर्षात मुंबईचा चेहरा बदलण्याचा निश्चय केलाय. त्यासाठी आम्ही प्रयत्नही करत असल्याची माहिती अस्लम शेख यांनी पत्रकारांना दिली आहे.

शहरातल्या ऐतिहासिक वास्तू, पादचारी पथ, खाऊ गल्लीसह अनेक ठिकाणांमध्ये बदल केले जातील, मुंबईकरांना आता आहेत त्याहीपेक्षा अधिक सुविधा देण्यासाठी अस्लम शेख प्रयत्नशील असल्याचं सांगत आहेत, त्यामुळे अस्लम शेख यांनी घेतलेली ही भूमिका पालकमंत्री या नात्याने घेतली आहे, की येत्या मुंबई पालिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली आहे, हे निवडणूक जवळ आल्यावरच कळेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments