आपलं शहर

मुंबईच्या बंद लोकलखाली भरडली जातेय सामान्य जनता

लॉकडाउन सुरु झालं आणि रुळांवर धावणारी मुंबई जागच्या जागी थांबली. अनेक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन सामान्य जनता ६ महिने जगली. खडतर दिवस काढून आता कुठे महाराष्ट्रातील जनसामान्यांचं आयुष्य पूर्वपदावर येताना दिसत आहे. हळूहळू लोक लॉकडाऊन पूर्वीचं जीवन जगताना दिसतायत. परंतु मुंबईतील सामान्य जनतेला पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही काही काळ वाट बघावी लागेल असं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे, मुंबईची जीवनवाहिनी म्हणजेच ‘मुंबई लोकल’. अजूनही सर्वसामान्यांसाठी रेल्वे चालू न झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्याच्या परिस्थितीत गव्हर्नमेंट सेक्टर, अतिआवश्यक सेवा, काही महत्वाच्या विभागातील कर्मचारी व महिला सोडल्यास इतर लोकांना रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. परंतु, कोरोनावरील लस उपलब्ध झाल्याने व मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची सुरुवात झाल्याने मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा विचार रेल्वेचे अधिकारी करत आहेत. लवकरच तसा प्रस्ताव मान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ट्रेन मध्ये जाण्यास मज्जाव असल्याने बऱ्याच खाजगी ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना इतर पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. ही साधने लोकल पेक्षा जास्त महाग आणि जास्त वेळखाऊ आहेत. इत्तर कोणताही पर्याय नसल्याने सामान्य जनतेला आर्थिक आणि मानसिक दोन्ही त्रास सहन करावा लागत आहे. लाखो लोकांची उपजीविका मुंबई लोकलवर चालत होती. फक्त मध्यम वर्गातील मंडळीच नाही तर उच्च-मध्यम वर्ग सुद्धा रोजच्या प्रवासासाठी लोकलचा वापर करीत होता. परंतु, लोकल चालू न झाल्याने प्रत्येक माणसाच्या उत्पन्नावर देखील त्याचा प्रभाव पडत आहे.

एपीएमसी मधील माथाडी कामगारांनी देखील त्यांना सामना करावा लागणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. एमएमआर मधील शेतकरी व दूधविक्रत्यांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर कसारा-आसनगाव-टिटवाळा तसेच कर्जत-बदलापूर-अंबरनाथ मधील दूधविक्रेत्यांना मुंबईला येऊन दूधविक्री करण्यासाठी भल्या पहाटे ४० लिटर दुधाचे ५ ते ६ डब्बे घेऊन रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.

या सर्व विक्रेत्यांकडे वस्तू वाहून नेण्यासाठी परवाना नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये अजूनच वाढ झालीये. रेल्वेसारखी कमी खर्चिक आणि जलद वाहतूक करणारी इतर कोणतीही साधने नसल्याने त्यांच्यातील अनेक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलीय .

राज्य सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची इच्छा दर्शवली होती. परंतु त्या निर्णयाबाबतीत सरकारची उदासीनताचं दिसून आली. सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून आंदोलन किंवा रस्तारोको करे पर्यंत राज्य सरकार वाट का पाहत आहे, असा सवाल प्रवासी आणि वाहक संघटनांनी केला आहे. सरकारने प्रवाशांचा अंत पाहू नये व लवकरात लवकर लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती देखील ते करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments