आपलं शहर

गच्चीवर सुरु होती थर्टी फर्स्टची पार्टी, अचानक झाली तरुणीची हत्या…

2021 मध्ये प्रवेश करताना अनेकांनी आपआपल्या परीने मजा केली. अनेकांनी थर्टी फर्स्टला धूम केली, मात्र ही पार्टी एका तरुणीचा जीव घेईल, अशी कोणाला अपेक्षाही नव्हती. हा प्रकार घडलाय मुंबईतल्या खार परिसरातील एका इमारतीच्या गच्चीवर. (The party started on the terrace, the murder of a young girl by an obscene couple, the incident in Khar)

खारमधल्या हायप्रोफाईल सोसायटीच्या गच्चीवर एक थर्टीफर्स्टची पार्टी सुरु होती. सोसायटीकडून ही पार्टी आयोजित केल्यामुळे सोसायटीमधील अनेक रहिवाशी या पार्टीला उपस्थित होते. पार्टी म्हटल्यावर अनेकांनी दारूचे सेवनदेखील केले होते. अनेकजण डिजेच्या तालावर नाचतदेखील होते.

हे सगळं सुरु असताना त्या गच्चीच्या कोपऱ्यातच एक जोडपं नववर्षाचं सेलिब्रेशन आपल्या अंदाजात साजरं करत होतं. ते जोडपं आक्षेपार्ह स्थितीत बसलं होतं. हे पाहून तिथे पार्टीसाठी आलेल्या एका तरुणीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आपलं बिंग फुटेल या भीतीने संबंधीत जोडप्याने त्या तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

एकीकडे गच्चीवर पार्टी सुरु होती, दुसरीकडे आक्षेपार्ह स्थीतीत बसलेलं जोडपं तरुणीला मारहाण करत होतं. मारहाण इतक्या जास्त प्रमाणात झाली की रुग्ण्यालयात नेण्याआधी त्या तरुणीचा मृत्यू झाला. ही गोष्ट पोलिसांना समजताच खार पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.

खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपलं पितळ उघडं पडेल या भितीने जोडप्याने त्या तरुणीस मारहाण केली, ज्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला आहे, तर संबंधीत जोडप्याला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कलम 302 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील चौकशी सुरु आहे. पार्टीत सहभागी झालेल्या इतर नागरिकांचीदेखील चौकशी सुरु आहे.

गच्चीवर पार्टी करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची परवानगी पोलिसांनी दिली नव्हती. तरीही पार्टी कशी काय आयोजित केली होती, याबद्दलही चौकशी सुरु आहे, त्यासाठी इमारतीच्या सेक्रेटरी तसेच संस्थेतील कमिटी मेंबरची चौकशी केली जाणार आहे.

अशीच एक घटना दक्षिण कोलकाताच्या पोद्दनगर परिसरातदेखील घडली आहे. तिथल्या एका इमारतीच्या गच्चीवर थर्टी फर्स्टची पार्टी सुरु होती. यादरम्यान एका 29 वर्षीय तरुणीचा गच्चीवरुन पडून मृत्यू झाला, ही तरुणी गच्चीवरुन पाय घसरून पडली की तिला कोणी ढकललं याबद्दल चौकशी सुरु आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments