खूप काहीफेमस

हे शिक्षक ठरलेत महाराष्ट्रातील रिअल हिरो,कामगिरी ऐकून थक्क व्हाल

एक रात्रीत झालेल्या लॉकडाउनमुळे संपूर्ण देश हादरला. प्रचंड अडचणींचा सामना करत आपला घर संसार डोक्यावर घेऊन अनेकांनी गाव गाठला. आता काय होणार असा साधा प्रश्न प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसत होता. पण, या सगळ्याचा जास्त फटका बसलेला आणि सहज दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी. आधीच ग्रामीण भागातील शाळेच्या पटावर विद्यार्थी संख्येचा आकडा हाताच्या बोटांवर मोजता येईल इतका होता. आणि लॉकडाउनमुळे तो पूर्णपणे पुसला गेला.

शाळेला अचानक लागलेल्या सुट्ट्या ह्या ‘सांग सांग भोलानाथ’ च्या गाण्यातल्या सुट्ट्यांप्रमाणे वाटायला लागल्या. लॉकडाउन हळूहळू उघडू लागलं आणि या सुट्ट्या वाईट स्वप्नाप्रमाणे नकोश्या झाल्या. याचं कारण म्हणजे शाळा सुरु तर झाल्या परंतु घरीच, मोबाईलवर. शहरी विद्यार्थ्यांच्या हातात असलेल्या मोबाईलमुळे त्यांची शाळा सहज सुरु झाली. पण याचा सर्वात जास्त फटका ग्रामीण विद्यार्थ्यांना बसला. साधा स्मार्टफोन घरात नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी बघता बघता शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकला गेला. कधी फोन नाही तर कधी नेटवर्क नाही. घरात खायला पैसे नाहीत तर रिचार्ज करणं दूरच !

यावेळेस विद्यार्थ्यांच्या मदतीला आले ते म्हणजे त्यांचे शिक्षक. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांनी इतरांच्या तुलनेत मागे राहू नये म्हणून मनात जिद्द घेऊन ते या मुलांच्या मदतीला धावून आले. मुलांना अभ्यासासाठी पुस्तकं पुरवण्यापासून ते घराबाहेर फळे लावण्यापर्यंत,मुलांना मोबाईल मिळवून देण्यासाठी कॅम्पेन करण्यापासून स्वतःच्या खिशातून खर्च करण्यापर्यंत होईल ती सर्व मदत या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना केली.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , युनिसेफ महाराष्ट्र्र, सपोर्ट ऑफ संपर्क यांनी एकत्रितपणे अशा शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करायचे ठरवले. स्वतःच्या आयुष्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला जास्त माहित देणाऱ्या काही शिक्षकांबद्दल आपण वाचणार आहोत.

कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगाव सारख्या गावात जिथे विद्यार्थ्यांना नेटवर्कसाठी जंगल पालथे घालावे लागत होते. तिथे शिरगाव माध्यमिक विद्यालयात शिकवणाऱ्या शमशुद्दीन अत्तर (वय ५३) या शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी ७८०००रुपयांचा नवीन लॅपटॉप खरेदी केला. ज्यावर नवनवीन विडिओ बनवून,नवीन शिक्षणाचे साहित्य तयार करून ते विद्यार्थ्यांना पाठवीत. असे असूनही फक्त ६० टक्के विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकत होते. उरलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने शमशुद्दीन यांनी फेसबुकचा वापर करत मदतीचा हात पुढे करण्याची मागणी केली. त्यांच्याच काही विद्यार्थ्यांनी फेसबुकवर ते पहिलं आणि मुंबईहून ३० मोबाईल व काही पैसे त्यांना पाठवून दिले. शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून ६५०००रुपये जमा करून एक झेरॉक्स मशीन खरेदी केली. ज्यामुळे १ ली पासून ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देखील त्याची मदत झाली.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात जिथे खाजगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटावरची संख्या जास्त असते,जिथे सरकारी शाळेत गणवेश,पुस्तके व वह्या सरकारतर्फे देण्यात येतात. अशा शाळांना लॉकडाउन मध्ये वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागला.
सातारा तालुक्यातील कराड जिल्हापरिषदेच्या शाळेसमोर त्यांच्या २,५६९ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी सांगितल्याप्रमाणे फ्री मोबाईल फोन्स व अभ्यासाचे साहित्य देऊनही ४० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नव्हते. त्यावर उपाय म्हणून शाळेने स्वतःच स्टुडिओ उभारण्याचा निर्णय घेतला. स्टुडिओ उभारून शूटिंग करून ते विडिओ स्थानिक वाहिनीवर घरोघरी दाखवले गेले. या सगळ्याचा एक महिन्याचा खर्च २२,००० येत होता. त्यामुळे, शाळेने पालकांना मदतीसाठी विनंती केली. दररोज ४ तासांची शाळा विद्यार्थ्यांना घरी टीव्ही वर दाखवण्यात आली. इतर शाळेतील विद्यार्थी मिळून ६०,००० विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.

सोलापूर

आपले विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून भरकटत जात असल्याचे पाहून सोलापूर जिल्हा, अकळुज तालुक्यातील माळेवाडी जिल्हापरिषदेच्या शाळेतील शिक्षिका स्मिता कापसे (४२) यांनी विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाण्याचे ठरवले. दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाणे शक्य नसल्याने त्यांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘कोरोना फायटर्स’ नावाचा ग्रुप बनवला. त्या स्वतः आणि त्यांचे विद्यार्थी इतर मुलांच्या घरी जाऊन त्यांची शिक्षणात मदत करत असत. “मी माझा मास्क चढवून सॅनिटायझर ची बाटली सोबत घेऊन स्कूटी वरून मुलांची मदत करण्याकरिता जायचे. माझ्या आधीच्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन असल्याने त्यांनी त्यावर इतरांची मदत केली.”असं त्या म्हणाल्या. अशा प्रकारे स्मिता यांनी १३० विद्यार्थ्यांची मदत केली.

मराठवाडा

औरंगाबाद जिल्ह्यामधील, पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा जिल्हा परिषदेची शाळा. ९ शिक्षक आणि २५० विद्यार्थी. त्यातले जास्तीत जास्त विद्यार्थी ऊसतोडणी कामगारांच्या घरातले. घरची परिस्थिती अतिशय गरीब. ”एप्रिल मध्ये आम्ही आमच्या शाळेचा व्हाट्सअँप ग्रुप बनवला. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने त्यांना शिकवायचे कसे असा प्रश्न होता. २ शिक्षकांनी १२ टॅब्लेट्स विद्यार्थ्यांना दिले. बी.एड चे विद्यार्थी व इतर शिक्षक अशी आमची ३४ जणांची ‘शिक्षक मित्र’ ची टीम तयार झाली. प्रत्येक गावात आम्ही २ जणांना विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी नेमून दिले होते. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले.” असे इयत्ता पाचवीचे शिक्षक भरत काळे यांनी सांगितले. शिक्षक जाण्यायेण्याचा खर्च स्वतःच्या पैशाने करत असत.

लॉकडाउनने आम्हाला नवीन पद्धतीने शिक्षण द्यायचे मार्ग शोधण्यास भाग पाडले. आम्ही विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारात जाऊ देऊ शकत नव्हतो. विद्यार्थी भारताच्या भविष्याचा पाया आहेत. आम्ही आमचं कर्तव्य केलं. अशा भावना या शिक्षकांनी व्यक्त केल्या.

 

 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments