आपलं शहरफेमस

सायकलवरून काम करत तिघांनी केला मुंबई ते कन्याकुमारीपर्यंतचा भन्नाट प्रवास

कोरोना काळात अनेक व्यक्तींनी घरूनच काम करणं पसंत केलं. अनेकांना जबरदस्तीने वर्क फ्रॉम होम दिलं गेलं तर अनेकांनी ते मागून घेतलं. अनेकांना घरून काम करण्याची सुरुवातीला खूप जास्त क्रेझ वाटली. काहींनी ते एन्जॉय केलं. परंतु , जसे दिवस पुढे सरकत गेले आणि लॉकडाउन वाढत गेलं तसं घरून काम करण्याचा अनेकांना कंटाळा आला. आम्ही घरातून बाहेर कधी पडू असा प्रश्न त्यांना पडला. पण घरून काम करण्याच्या या पद्धतीला फाटा देत मुंबईतील तीन तरुणांनी सायकलवरून थेट गाठली ती कन्याकुमारी.

बॅकेन जॉर्ज, अल्विन जोसेफ आणि रतिश भालेराव या तिघांनी कोरोनाकाळात चक्क महिनाभर सायकल चालवत मुंबई ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास करून सगळ्यांनाच चकित केले आहे. सायकलवरून प्रवासादरम्यान ते हायवेवरील कोणत्याही ढाबा किंवा लॉज मध्ये थांबून ऑफिसच्या कामासाठी लॅपटॉपद्वारे लॉग इन करत. अशा प्रकारे त्यांनी तब्बल १,६८७ किमी इतका प्रवास केला आहे.

मागील वीस वर्षांपासून मित्र असलेले तिघेही घरून काम करून कंटाळले होते. घरी बसून नैराश्येच्या आणि वाईट विचारांच्या आहारी जाणे किंवा अशा अवघड परिस्थितीमध्ये चिडचिड करण्यापेक्षा त्यांनी ‘सायकल वरून काम ‘ ची संकल्पना प्रत्यक्षात आणायचे ठरवले. त्यांच्या मते ते सहज सोपं कधीच नव्हतं परंतु त्यांनी हे करून दाखवायचं मनावर घेतलं होतं.

जॉर्जने (वय ३१) आपल्या आयुष्यातील लॉन्ग डिस्टन्स सायकलिंग ट्रिप आपण नोव्हेंबर मध्ये करायचीचं असं मनात ठरवलं होतं. त्याने त्याच्या मित्रांना याबाबत विचारलं. जॉर्ज ट्रिपला निघायच्या दोन दिवस आधी म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही मित्रांनी त्याच्या सोबत जायचा निर्णय त्याला कळवला. त्या तिघांनी आपली ट्रिप डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण केली.

मुंबई ते कन्याकुमारी असा त्यांनी दररोज ८० किमी प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माणसे अनुभवली. त्यांच्या जेवणाच्या पद्धती, त्यांचे राहणीमान, तिथली संस्कृती हे सर्व त्यांना अनुभवायला मिळालं. रोड ट्रिप असल्याने नैसर्गिक सौंदर्य देखील अनुभवायला मिळलं. या दिवसात त्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, देवनागरे, बंगळुरू, सालेम, मदुराई आणि तिरुनेलवेली असा प्रवास केला.

त्यांनी या प्रवासादरम्यान २६ दिवसात एका व्यक्तीसाठी २५,००० इतका खर्च केला ज्यातला जास्तीचा वाटा हा हॉटेलमध्ये राहण्यासाठी खर्च झाला. ”आम्ही दमलोय पण याचं आठवणी आमच्या सोबत परत जाणार आहेत. साध्या सायकली आणि जिद्द ,सोबतीला मित्र असतील तर कोणीही असा अविस्मरणीय प्रवास सहज साध्य करू शकतो “असं जोसेफ यांनी सांगितलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments