आपलं शहर

BMC Budget 2021 : कोस्टल रोडसाठी अजून किती खर्च, बीएमसीकडून हवी तितकी खैरात…

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज 2021-22 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना आणि आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडसाठी तब्बल दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईतील बहुचर्चीत कोस्टल रोडचे काम 2018 मध्ये सुरू झाले आहे. कोस्टल रोडच्या बांधकामासाठी जवळपास 8 हजार कोटींचा खर्च आहे. त्यामध्ये टॅक्स, सल्लागार शुल्क आणि इतर गोष्टींचा समावेश झाल्यास या प्रकल्पाचा एकूण खर्च 12 हजार 950 कोटी इतका होतो. कोस्टल रोड चार ते पाच वर्षात पुर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

2018 पासून विविध अडचणी येत या प्रकल्पाचे 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. कोर्टाने दिलेल्या कामबंद आदेश आणि कोरोना महामारीमुळे या प्रकल्पाचे काम बाधित झाले होते. या प्रकल्पासाठीची 2020-21ची अर्थसंकल्पीय तरतूद 1500.07 कोटी इतकी आहे. त्यामधून आतापर्यंत जवळपास 1189.75 कोटींचा खर्च झाला आहे.

2020-21 सुधारीत अंदाजात 1500.01 कोटी व 2021-22 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये जवळपास 2000.07 कोटींची तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

दरम्यान, या अर्थसंकल्पात गोरेगाव- मुलुंड जोड रस्त्यासाठी (GMLR) 1300 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा जोडरस्ता मुंबई शहराच्या पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगर यांना जोडणारा चौथा प्रमुख रस्ता असून चार टप्प्यात त्याचे काम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम सन 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

तर, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्यासाठी 1 हजार 119 कोटी आणि मिठी नदी प्रकल्पाच्या कामांसाठी 67 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments