कारण

Ghulam Nabi Azad : काश्मीरचा नेता, महाराष्ट्रात लढतो, जिंकतो; शरद पवार भावुक

राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज संपणार आहे. यावेळी त्यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अन्य नेतेमंडळींनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक प्रसंग सांगत असताना भावूक झाले. शरद पवार हेदेखील यावेळी काहीसे भावूक होताना पाहायला मिळाले.

गुलाम नबी आझाद यांच्यासमवेत काम करण्याची संधी मला अनेक वर्षे मिळाली. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसच्या विचारधारेपासून केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी युवक संघटनेचे काम देखील केले आहे. त्यांचे संघटनकौशल्य बघून काँग्रेसने राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना सोपवली. ही जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी नव्या पिढीला संघटित करण्याचे काम केले, असे शरद पवार म्हणाले.

1982च्या निवडणूकीचा किस्सा
गुलाम नबी आझाद यांच्या आयुष्यातील 1982 हे वर्ष त्यांना कायम स्मरणात राहील असेच आहे. गुलाम नबी आझाद यांचा विवाह याचवर्षी संपन्न झाला होता. नेमकं त्याचवर्षी महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम वाशिम जिल्ह्यातून निवडणूक लढविण्याची संधी त्यांना काँग्रेसने दिली होती. 1982 च्या निवडणूकीचा एक किस्सा यावेळी शरद पवारांनी सांगितला.

“त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. काश्मीरहून आलेल्यांना आपण इथून जिंकून द्यायचे नाही, असा प्रचारंच त्यावेळी मी केला होता. मात्र तरीही गुलाम नबी आझाद मोठ्या मताधिक्याने तिथून निवडून आले होते. त्यांनी वाशिमच्या लोकांचा विश्वास संपादित केला आणि जिल्ह्याचा चेहरामोहरा कसा बदलेल यावर काम केले. आझाद यांनी संपूर्ण विदर्भाच्या विकासाठी आपले योगदान त्यावेळी दिले होते.”

राजकारणात संघर्ष होत राहतात, मात्र…
तसं पाहायला गेले तर राजकारणात संघर्ष हे होतंच असतात मात्र आझाद यांनी कायम व्यक्तिगत सलोखा जपण्याचे कामे केले आहे. संसदीय कार्यमंत्री असताना देखील त्यांचे सर्व विरोधी पक्षातील सदस्यांशी चांगले संबंध होते. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी ते विरोधी पक्षातील सदस्यांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे, असे पवार यावेळी म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments