कारण

ठाकरे सरकारचा राज्यपालांना इशारा, चक्क विमान प्रवासाची परवानगी नाकारली…

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळालं. त्यामुळे कोश्यारी यांना नाइलाजास्तव राजभवनावर यावे लागले.

राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यलयाला परवानगी मागितली होती. मात्र, परवानगी मिळाली नाही.

महाराष्ट्र शासनाने सरकारी विमानाने प्रवास करण्याला परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. स्पाईसजेट या विमानाने राज्यपाल कोश्यारी मुंबईहून डेहराडूनला रवाना झाले. राजभवनाच्या पीआरओकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
अजित पवार
मला याबाबत काहीच माहिती नाही. आता प्रसारमाध्यमांशी बोलल्यानंतर मला ही घटना समजली. मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन यावर बोलेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार
राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

विनायक राऊत
राज्यपालांना अद्यापही महाराष्ट्र सरकारच्या विमान वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यांनी परवानगी मागितली होती. पण ते विमान उड्डाणास सक्षम आहे की नाही यासंदर्भात पुरेपूर माहिती नव्हती. त्यामुळे कदाचित परवानगी दिली नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचा आदर केला आहे, त्यांचा अवमान कदापिही होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.

प्रवीण दरेकर
राजकारणातील मतभेद समजू शकतो, राज्यपाल घटनात्मक पद आहे. राज्य सरकारनं अतिरेक केला आहे. सूड भावना त्यांच्यामध्ये किती भरलीय हे स्पष्ट होत आहे. अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

देवेंद्र फडणवीस
राज्यपालांना विमान नाकारणं हा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मालकीची ही मालमत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिलं होतं. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचलं होतं पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.

(Maharashtra Thackeray government denied permission for the governor Bhagat Singh Koshyaris air travel)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments