Mumbai(corona) : पालिकेचा खुलासा, लसीच्या दुसऱ्या डोसनंतर फक्त 26 जणांना कोरोना, मात्र…
Mumbai( corona) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यासह देशात विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत

Mumbai(corona) :
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यासह देशात विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत, लॉकडाऊन, इव्हन ऑड सिस्टिम, सोशल डिस्टन्स अशा अनेक गोष्टींची अंमलबजावणी केली जात आहे, त्यातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण. मुंबईत अनेकजणांचे कोरोना लसीकरणाचे दुसरे डोस पूर्ण केले आहेत. त्यामुळेच मुंबईतही कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत चालला आहे. मुंबईत कोरोना रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग झपाट्याने वाढला असला तरी मुंबईमध्ये कोरोनावर मात करण्यात यश आलं आहे. त्यामध्ये लसीकरणाने मोठी जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईमधील 2.9 लाख कोरोना रूग्णांच्या सर्वेक्षणात हे स्पष्ट दिसून आले आहे. मुंबई पालिकेनं (BMC) 1 जानेवारी ते 17 जून या कालावधीत 2 लाख 90 हजार कोरोना रुग्णांचं सर्वेक्षण केलं आहे आणि या सर्वेक्षणातून दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मुंबईत काही लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही. मात्र कोरोना लसीचा पहिला डोसही अधिक चांगलं काम करत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 2.9 लाख लोकांपैकी केवळ 26 जण कोरोनाची दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्याचबरोबर पहिल्या डोसनंतर 10 हजार 500 जणांना कोरोनाची लागण झाली. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2021 ते 17 जून 2021 या काळात मुंबईत सुमारे 40 लाख 75 हजार 393 लोकांनी लस घेतली. यापैकी केवळ 0.23% लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे.
मुंबई पालिकेच्या वॉर रूमने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, दुसर्या लाटेत मुंबईत 3.95 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी वॉर रूमने 2.9 लाख रुग्णांशी संपर्क साधून त्यांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी बहुतेक रुग्ण होम आयसोलेशन असलेले रुग्ण होते. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 53.83 लाख लोकांनी लस घेतली आहे. त्यापैकी 10 लाख लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.