Mumbai Unlock? : मुंबईकरांचा रोड शो, गाड्यांची इतकी गर्दी कशासाठी?
मुंबई कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत चालले आहे.

मुंबई कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत चालले आहे. राज्यात आलेल्या दुसऱ्या लाटेवर मुंबई पालिकेने चांगलं यश मिळवलं आहे, अनेक ठिकाणी मुंबईत कोरोनाची प्रकरणे कमी दिसत आहेत, मात्र या सगळ्याकडे लोकांचे दुर्लक्ष होत आहे.
मंगळवारी सकाळपासून मुंबईचा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. एकीकडे जिथे महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या तिसर्या लाटेची तयारी करत आहे, तिकडेच दुसरीकडे मुंबईच्या रस्त्यांवर लांबलचक गाड्यांच्या रांगा लागल्याने अत्यंत चिंताजनक चित्र समोर आले आहे.
लॉकडाऊन जरी 15 जूनपर्यंत लागू असला, तरी राज्यातील अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे, टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरू केल्या जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health minister Rajesh Tope) यांनी दिली होती. मात्र पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी नियमांना केराची टोपली दाखवली आहे.
मुंबईत रस्त्यावर विनाकारण लोक फिरताना दिसत आहेत, परप्रांतीय पुन्हा एकदा आपला व्यवसाय करण्यासाठी राज्यात येऊ लागले आहेत, उत्तरप्रदेश, बिहार अशा राज्यातील अनेक ट्रेन मुंबईकडे रवाना झाल्या आहेत, त्यामुळे मुंबईमध्ये पहिल्यासारखी गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनेकजण लॉकडाऊन खूप दिवसांनी उघडल्यामुळे मौजमजेसाठी गाड्या घेऊन घराबाहेर पडले आहेत, त्यामुळेही रस्त्यावर गर्दी दिसू लागली आहे. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन, नागरिकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे.
या सगळ्यावर राज्याने पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. जर गर्दी अशीच वाढत राहिली, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर लॉकडाऊनही वाढेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे मुंबईच्या मुलुंड आणि दहिसर या याठिकाणी झालेली गर्दी हेच पुन्हा लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधांचे संकेत आहेत का, हे पाहणे गरजेचे असणार आहे.