खूप काही

AASMA SHEKH : खूप शिकून स्वत:चं घर घ्यायचंय, फूटपाथवर राहणाऱ्या असमाचं पाहा मोठं स्वप्न

प्रत्येकजण स्वप्न बघत असतं; पण ती पूर्ण करण्याची जिद्द ही सर्वांमध्येच असते असं नाही. मुंबईला आपण स्वप्ननगरी बोलतो, इथे सर्वांचे स्वप्न पूर्ण होतात म्हणे? कारण तिथे आपोआपच अनेक ध्येय मनाशी चिटकून राहतात.

aasma shekh : प्रत्येकजण स्वप्न बघत असतं; पण ती पूर्ण करण्याची जिद्द ही सर्वांमध्येच असते असं नाही. मुंबईला आपण स्वप्ननगरी बोलतो, इथे सर्वांचे स्वप्न पूर्ण होतात म्हणे? कारण तिथे आपोआपच अनेक ध्येय मनाशी चिटकून राहतात. असच एक स्वप्न मुंबईच्या रस्त्यावर वाढत आहे. खरंच स्वप्न बघायला ऐपत लागत नाही हे आज समजलं.

मुंबईच्या फुटपाथवर राहणारी असमा तिची शिक्षणाची चिकाटी आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बघून खरंच कौतुकास्पद शब्द नक्कीच बाहेर येतील. तिचं स्वप्न म्हणजे तिला तिच्या आईवडिलांसाठी स्वतःचं घर घ्यायचं. आपल्यासाठी जरी ते लहान स्वप्न असलं, तरी तिच्यासाठी स्वतःचं घर घेणं हे खूप मोठं स्वप्न आहे.

लहानपणापासून फुटपाथवर सुरू झालेलं असमाचं आयुष्य तिला फुटपाथवरच संपवायचं नाही. असमाचे आजोबा मुंबईमध्ये आले होते, तेव्हापासून ते फुटपाथवर राहत आहेत. तिच्या वडिलांचा जन्मदेखील इथेच झाला आणि आयुष्यदेखील त्यांनी फुटपाथवरच काढलं. त्यांचंदेखील हातावरचं पोट, दिवसभर कमवायचे आणि दोन वेळचं खायचं. तिच्या आजोबांनी आतापर्यंत शाळेची पायरी चढली नाही, त्यामुळे वडील शिकले नाहीत म्हणून आपण शिकायचं, असं असमाचं स्वप्न आहे.

ती शिकते, कारण तिला तीच स्वप्न पूर्ण करायचा आहे. सध्या असमा चर्चगेटच्या के.सी कॉलेजमध्ये 12 आर्ट्समध्ये शिकत आहे. लॉकडॉउनमुळे सध्या लायब्ररी आणि कॉलेजेस बंद आहेत, याचा फटका तिला बसला. ऑनलाइन शिक्षणामध्ये तिला अडथळा निर्माण होतो, कारण फुटपाथवर अभ्यास करणं ही खरंच अडचणीची गोष्ट आहे. तिने अकरावीचे वर्षदेखील फुटपाथवर ऑनलाइन लेक्चर अटेंड करून पूर्ण केलं. वाहनांच्या आवाजामुळे ऑनलाइन शिक्षणामध्ये खूप अडथळा आला ही गोष्ट वेगळीच, त्यात बाकीच्या समस्येंशीही मोठ्या प्रमाणात तिला संघर्ष करावा लागतोय, हा भाग वेगळा. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालाअसून देखील तिला तिथे जाण्याची भीती वाटते. हा न्यूनगंड काही वेगळच सांगतोय.

असमाचे वडील सलीम शेख, हे बीएमसी कार्यालयाजवळ लिंबू पाण्याची गाडी लावत होते, परंतू लॉकडॉऊनमुळे त्यांचं ते काम बंद झालं, आता मिळेल ते काम करून किंवा कधी कधी हमाली, मजुरी करून ते त्यांच्या परिवाराला सांभाळत आहेत. कारण त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणातही हुशार बनवायचं आहे. त्यांनी बघितले ते दिवस त्यांना त्यांच्या मुलांना दाखवायचे नाहीत, तेवढी त्यांची जिद्द आहे.

त्या फूटपाथवर राहण्याचे हालदेखील काही वेगळे आहेत. अजून आपल्या शहरांमध्ये मुली सुरक्षित नाहीत, मग त्या फूटपाथवर राहणाऱ्या कशा असू शकतात, हा विचारदेखील होत नाही. त्यांनी शांत झोप घ्यावी यासाठी असमासे आई-वडील रात्रभर पहारा देतात. परंतू एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीचा सामना करत असमाने एक स्वप्न बघून, त्याला पूर्ण करण्याची जिद्द त्याच्यामध्ये धारण केलेली आहे, खरंच कौतुक करावं तितकं कमीच, अशा मुंबईत अनेक असमा स्वत:चं ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळे अशा अनेक असमांना वंटासकडून सलाम.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments