खूप काही

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये बोगस लसीकरण, कंपनीकडून उकळले 4,24,536 रुपये

कोरोनापासून वाचण्यासाठी जगभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र लसीचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवतोय. यामुळे अनेक ठिकाणी बोगस लसीकरण यांचे प्रकार समोर आले आहेत.

‍   navi mumbai: कोरोनापासून वाचण्यासाठी जगभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र लसीचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवतोय. यामुळे अनेक ठिकाणी बोगस लसीकरण यांचे प्रकार समोर आले आहेत. ‍मुंबईच्या कांदिवलीमध्ये झालेल्या बोगस लसीकरणानंतर आता नवी मुंबईमध्ये देखील असा प्रकार समोर आला आहे.

डॉक्टर मनिष त्रीपाठी हे या सर्व प्रकाराचे मुख्य सुत्रधार आहेत, त्यांच्यासोबत आणखी दोन जणांवर नवी मुंबई तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी येथील कंपनीत लसीकरणा दरम्यान कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय. एवढेच नव्हे तर बनावट लसीकरण करून संबंधितांनी कंपनीकडून 4 लाख 24 हजार 536 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

नवी मुंबईच्या नेरूळ येथे राहणार्‍या फिर्यादी कल्पेश पद्माकर पाटील यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पाटील काम करत असलेल्या अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी कंपनीत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केइसीपी हेल्थ केअर रुग्णालयाचे डॉ. मनीष त्रिपाठी, करीम आणि आणखी एक इसम यांनी संगनमताने प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी यांची नेमणूक न करता खोटे लसीकरण केले गेल्याचं उघड झालं आहे.  प्रशिक्षित डॉक्टर असल्याचे सांगून नानावटी रुग्णलयात वेगळ्या तारखांना ऑनलाईन माहिती भरून दोन जणांना प्रमाणपत्र देऊन ते खरे असल्याचे दाखवण्यात आले आहे.

350 लोकांची प्रमाणपत्र न देऊन फसवणूक केली आहे. या लसीकरणाची जबाबदारी केईसीपी हेल्थ केअर हॉस्पिटलवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार डॉ. मनीष त्रिपाठी यांनी त्यांचे पथक त्याठिकाणी पाठवले होते. 23 एप्रिलला हे शिबीर भरवले असता त्यावेळी कंपनीतल्या 352 कामगारांचे लसीकरण करून 4 लाख 24 हजार रुपये उकळण्यात आले होते. याशिवाय लसीकरण केल्याचे त्यांना बनावट प्रमाणपत्र देखील देण्यात आले. मात्र काही कामगार दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता, त्यांना पहिल्या डोस घेतल्याचे देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले.

कंपनीतर्फे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड, उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्यामार्फत तपास सुरु होता. यामध्ये कंपनीच्या 352 कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचे समोर आले. तर कांदिवली, नवी मुंबईसह इतर कोणकोणत्या ठिकाणी असे बोगस लसीकरण झाले आहे का, याबाबत डॉ. त्रिपाठीकडून माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments