Political Update:पडळकरांच्या गाडीवर हल्ला, दगडफेकीनंतर गोपीचंद म्हणतात…
Political Update:भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार (MLC) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

Political Update :भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार (MLC) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, 30 जून रोजी ही घटना घडली, सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही; पण गाडीच्या काचेवर दगड लागून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
गाडीची काच फोडल्यानंतर या व्यक्तीनं त्याठिकाणाहून पळ काढला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर हल्ला कऱण्यात आला. गाडीवर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, की बुधवारी सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात माझ्या बैठका सुरू होत्या. त्यानंतर मड्डी वस्ती येथील बैठकीला मी पोहोचलो. ही बैठक झाल्यावर मी गाडीत बसून निघालो होतो, त्याचवेळी एका व्यक्तीने गाडीवर हल्ला केला. सोलापूर येथे माझा कुणासोबतही वाद नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पडळकर म्हणतात माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी घाबरणार नाही.
विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीका करत आहेत. शरद पवार, संजय राऊत यांच्यावर सातत्याने पडळकर टीका करत आहेत. अशात त्यांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.