‘मुंबईतील सिंह सफारीचा दी एन्ड’; कारण आलं समोर, मुंबईकर नाराज
बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारी लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. दोनचं सिंहाच्या बळावर सुरु असलेल्या सिंह सफारीतील एक सिंह वयोवृद्द झाला असून दुसरा सिंह पिंजऱ्यात बंदिस्त आहे.

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारी लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. दोनच सिंहाच्या बळावर सुरु असलेल्या सिंह सफारीतील एक सिंह वयोवृद्द झाला असून दुसरा सिंह पिंजऱ्यात बंदिस्त आहे. त्यामुळे परराज्यातून सिंहांची जोडी नॅशनल पार्कमध्ये रवाना झाली नाही, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीला टाळे लागण्याची वेळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनावर येण्याची शक्याता आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील नेहरू झुओलोजिकल पार्कमधून एक सिंहाची जोडी देण्यासाठी तेलंगणा वनविभागाला संपर्क केला होता, तिकडून आलेल्या सिंहाच्या जोडीच्या मोबदल्यात एक वाघाटीची जोडी देण्याचे लेखी अश्वासनही करण्यात आहे होते, मात्र आता तेलंगणा राज्याने एक सिंहाची जोडी मागितल्याने ही देवाणघेवाण रद्द करण्यात आली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या तीनच वाघाटी उरले आहेत. 11 वर्षांचा नर आणि 4 वर्षांच्या 2 मादी ह्या उद्यान प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे उद्यान विभागाने देशातील पहिला वाघाटी प्रजनन प्रकल्प सुरु केला आहे. परंतु नर वाघाटी आता म्हातारा झाल्याने तो प्रजननासाठी योग्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपलब्ध वाघाटींच्या प्रजननातून नवा वाघाटी जन्माला घालण्याचा उपक्रम बंद पडला आहे. त्यात नर-मादीची जोडी इतरांना दिल्यास प्रकल्पाचा गाशाच गुंडाळावा लागेल. 2 नर सिंहच उरलेले असताना सिंहाची जोडी कुठून देणार, असाही प्रश्न उद्यान प्रशासनासमोर राहिला आहे.