घटना

ना खड्ड्यांचं टेन्शन, ना मेगाब्लॉक; मुंबई ते बेलापूर पाण्यातून प्रवास फक्त 300 रुपयांत

देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये अनेक विकास कामांना सुरुवात झालीये. त्यातील एक भाग म्हणजे मुंबई ते बेलापूर यांना पाणी मार्गाने जोडणे.

मुंबई ते बेलापूर हे अंतर कापण्यासाठी आतापर्यंत लोकल किंवा रस्ते मार्गांचा वापर करावा लागायचा, मात्र त्यामुळे ट्राफिक, सिग्नल्स, मेगाब्लॉक अशा समस्यांना सामोरे जावं लागत असे, मात्र आता या सगळ्यांवर उपाय निघाला आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई ते नवी मुंबईच्या दरम्यान जलवाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई ते बेलापूर, नेरुळ ही ठिकाणे जलवाहतूकीच्या माद्यमातून एकमेकांना जोडली जाणार आहेत. अत्याधुनिक अशा वॉटर टॅक्सीमधून हा प्रवास हवेशीर आणि निवांतपणे करता येणार आहे. वॉटर टॅक्सी तब्बल 25 नोट्स इतक्या वेगाने धावते. त्यामुळे कमीत कमी वेळेत मुंबईपासून नेरूळ, बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा इथे पोहोचता येणार आहे. त्यासाठी ‘बुक माय बोट डॉट कॉम’ bookmyboat.com या वेबसाइटवर तिकीट उपलब्ध असेल.

भाऊचा धक्का इथे असलेल्या डोमेस्टिक क्रुज टर्मिनलमधून आपल्याला या हाईस्पीड वॉटर टॅक्सीचा प्रवास करता येईल. बेलापूर आणि नेरुळ येथे याच जलवाहतुकीसाठी क्रुज टर्मिनलदेखील निर्माण करण्यात आलेलं आहे.

सध्या नेरूळ किंवा बेलापूर इथून सीएसएमटीपर्यंत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास करायचा झाला तर एक तास पाच मिनिटे इतका वेळ लागतो. तोच प्रवास रस्ते मार्गाने करायचा असल्यास रस्त्यावरचे खड्डे, अनेक ठिकाणी मिळणारे ट्राफिक, वाशी इथला टोल आणि असंख्य अडचणींचा सामना करून दीड ते दोन तास आपल्या लागतात.

त्या मानाने मुंबई बेलापूर ही जलवाहतूक सर्वात वेगवान समजली जात आहे. इन्फिनिटी हार्बर सर्विस या कंपनीला जलवाहतुकीचे लायसन्स मिळाल्याने त्यांनी तीन मार्गांवर ही जलवाहतूक सुरू करण्याचे ठरवले आहे, या सगळ्या संकल्पनेला मुंबईकरांकडून कसा प्रतिसाद मिळणार आहे, ते पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते बेलापूर प्रवास करण्यासाठी एका ट्रीपचे एका व्यक्तीला 300 रुपये तिकीट आकारले जाईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments