BMC साठी राज ठाकरे मैदानात; मनसेच्या बैठकीत मुद्यांवर चर्चा
आगामी महानगरपालिकांसाठी मनसेने रणशिंग फुकलं ; राज ठाकरेंच्या उपस्थित मनसेची बैठक

आगामी मुंबई, नवी मुंबई, नाशिक आणि ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली असून 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
राज्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, नवी मुंबई, मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक आहे. याला अनुसरून देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.
नवी मुंबई, नाशिक, ठाणे येथील परिस्थितीचा आढावा राज ठाकरे पधाधिकाऱ्यांकडून घेणार असल्याचे समजते. शिवाय यावेळी राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना कानमंत्रही देणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद, नाशिक आणि पुण्याचा दौरा करून मनसे सैनिकांशी चर्चा केली होती. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली होती.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बैठकीत देखील यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी मनसेने आणि भाजपने काही ठिकाणी मनसेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण नेमकं कुठे जातंय हे पाहावं लागेल. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.