मला माहित होतं की…; वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचे स्पष्टीकरण म्हणाले…
मला माहीत होतं की समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत, वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचे स्पष्टीकरण म्हणाले...

Bhagat Singh Koshyari Statement : चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. अस वक्तव्य केल्याने राज्यपालांवर अनेक स्तरातून टीका केली जात होती. राज्यपालांनी अखंड महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून न्यायालयाने देखील याबाबत निकाल देऊनही संविधानिक पदावर असणारी व्यक्ती अस वक्तव्य करत असेल तर त्यांनी माफी मागावी अशा भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत होत्या. यावर राज्यपाल भगत सिंग कोशारी यांनी आपली बाजू मांडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती, जेवढं मी सुरुवातीच्या काळात वाचलं होतं, त्यावरून मला माहीत होतं की समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत. मात्र इतिहासातील काही तथ्यं मला लोकानी सांगितली आहेत, तर मी ती तथ्यं पुढे तपासून घेईन. असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांना सांगितलं. ते सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधताना म्हणाले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे आयोजित श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत एक वक्तव्य केलं होत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीका करत अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली.