फेमस

Lata Mangeshkar : एका सिनेमाची संधी हुकली आणि लतादीदींनी शिकली थेट उर्दू भाषा…

संगीताचा खरा अर्थ समजवणारी ही गान कोकिळा सदा संगीतप्रेमिंच्या ह्रुदयात अधिपत्य गाजवत राहील, कारण सूर्याला कधीच अंत नसतं!

लता मंगेशकरांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर येथील एका मराठी कुटुंबात झाला. ते मुळात एका संगीतमय कुटुंबातलेच. त्यांचे वडील पंडित दीनदयाळ मंगेशकर थिएटर कलाकार आणि प्रसिद्ध गायक होते. ( Lata Mangeshkar :  Missed an opportunity for a movie and Latadidi learned Urdu directly… )

संगीतमय कुटुंबातून असल्याने संगीत त्यांच्या रक्तारक्तात होते. बाळपणी त्यांचे नाव ‘ हेमा’ ठेवण्यात आले होते, पण जेव्हा ते 5 वर्षीय होते तेव्हा त्यांचे नाव बदलून ‘ लता’ ठेवण्यात आले. जन्मानंतर काही वर्षाने मंगेशकर कुटुंबाने महाराष्ट्रात स्थलांतर केले.

मीना, आशा, उषा, हृदयनाथ असा लता दीदींचा बंधूपरिवार आणि त्यात लता मंगेशकर या साऱ्यांमध्ये थोरल्या होत्या. 1942 साली दीनदयाळ मंगेशकरांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे खास मित्र विनायक दामोदर कर्नाटकी मंगेशकर कुटुंबाचे आधारस्तंभ बनले. आज ज्या लता दीदी गानसम्राज्ञी म्हणून ओळखले जातात त्या मागे विनायक कर्नाटकींचा फार मोठा वाटा आहे.

वडिलांचे निधन हे दीदींच्या लग्न न करण्याचे मुख्य कारण बनले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की,”घरात थोरली असल्यामुळे वडीलांनंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. त्या कामात आणि त्या जबाबदारीत मला लग्नाचे भानचं राहिले नाही.”

वयाच्या अगदी 5व्या वर्षी लतादीदींनी मराठी संगीत नाट्यात त्यांचे पहिले पाऊल ठेवले. इथूनच त्यांचा लता मंगेशकर पासून ते गान कोकिळा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर बनण्याचा प्रवास सुरू झाला. 1942 साली त्यांनी त्यांच्या आयुष्यातले पहिले गीत ‘ नाचू या गडे आणि खेळू सारी मनी हौस भारी’ हे दोन गाणे ‘ किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी गायले. पण काही कारणास्तव हे दोन्ही गाणे चित्रपटातून वगळण्यात आले. या दोन गाण्यांच्या माध्यमातून दीदींनी मराठी सिनेमासृष्टीत पाऊल टाकले खरे पण ते व्यर्थ गेले.

लता दीदींनी खऱ्या अर्थाने मराठी सिनेमासृष्टीत पाऊल ‘पहिली मंगला गौर’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून टाकले. त्या चित्रपटात त्यांनी ‘नटली चैत्राची नवलाई’ हे गीत गायले.

त्यांच्या पहिल्या हिंदी गीताची कहाणी पण खूप अनोखी आहे. कारण त्यांनी त्यांचे हिंदी गीतांमधील पहिले पाऊल हिंदी सिनेमातून नव्हे तर मराठी चित्रपटातूनच ठेवले. त्यांनी 1944 सालच्या ‘गजाभाऊ’ नावाच्या मराठी चित्रपटात ‘माता, एक सपूत की दुनिया बदल दे तू’ हे हिंदी गाणे गायले होते. जे लता मंगेशकरांचे पहिले हिंदी गीत ठरले.

मुंबईत आल्यानंतर दीदींनी उस्ताद अमानात अली खान यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली पाकिस्तानात गेले. त्यामुळे लतादीदींनी उस्ताद अमानत अलीनंतर उस्ताद बडे गुलाम अली खान, पंडित तुलसीदास शर्मा आणि अमानत खान देवसले यांच्याकडून संगीत शिकले.

लता दीदींना अनेक गोष्टींचा सामनादेखील करावा लागला होता. त्यांच्या पातळ आवाजामुळे त्यांना ‘ शहीद’ चित्रपटात गाण्याची संधी मिळाली नव्हती. हिंदी गाण्यांमध्ये उर्दू शब्दांचा जास्त वापर होत असल्याने लता दीदी अनेक वेळा उच्चारादरम्यान चुकल्यादेखील होत्या. दिलीप कुमार यांनी ही चूक लक्षात घेता दीदींना त्याबद्दल समजावले. या कारणामुळे लता दीदींनी उर्दू भाषेचे प्रशिक्षण सुद्धा घेतले होते.

लता दीदींनी त्यांच्या मधुर आवाजाच्या माध्यमातून या सृष्टीला 30,000 पेक्षा जास्त सदाबहार गाण्यांची भेट दिली आहे. लता दीदींनी आजपर्यंत 36 भारतीय भाषांमध्ये गीत गायले आहेत. मराठी, हिंदी, तमिळ, नेपाळी, कन्नड, बंगाली, भोजपुरी, आसामी अश्या अनेक भारतीय  आणि काही विदेशी भाषेत त्यांनी गायन केले आहे. त्यांनी यातून लोकांना दाखवून दिले आहे की, “संगीताला कोणतीच भाषा नसते याउलट संगीतच एक भाषा असते.”

लता मंगेशकर, 1969 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मविभूषण झाल्या.  1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 1999 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. 2001 मध्ये त्यांना भारतात सर्वोच्च मान असणाऱ्या भारतरत्नाने गौरवण्यात आले. 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 12 बंगाल चित्रपट पत्रकार संघाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. लतादीदींनी 1948 ते 1989 पर्यंत 30 हजारांहून सर्वाधिक गाणी गायली आहेत आणि हा एक रेकॉर्ड आहे.

6 फेब्रुवारीच्या सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी या सूर्याचा अस्त झाला. हे 70 दशकांपासून अधिपत्य गाजविणारे युग संपले. परंतु संगीताचा खरा अर्थ समजवणारी ही गान कोकिळा सदा संगीतप्रेमिंच्या ह्रुदयात अधिपत्य गाजवत राहील, कारण सूर्याला कधीच अंत नसतं!

भावपूर्ण आदरांजली!

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments